Vinod Tawade News | मुख्यमंत्री पदावरून विनोद तावडेंचे विधान चर्चेत; म्हणाले – ‘ज्या नावांची चर्चा असते, ते मुख्यमंत्री होत नाहीत’

मुंबई: Vinod Tawade News | राज्यात विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Assembly Election 2024) रणधुमाळी सुरु आहे. निवडणुकीनंतर सत्ता कोणाकडे जाणार? मुख्यमंत्री कोण होणार? अशी राज्यभर चर्चा सुरु आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील (Mahayuti Vs Mahavikas Aghadi) अनेक नेत्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनरही झळकले.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. जाहीरनामे प्रसिद्ध केले जात आहेत. आश्वासने दिली जात आहेत. यातच आता भाजपा नेते विनोद तावडे यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत केलेले एक विधान चर्चेत आले आहे.
माध्यमांशी बोलताना विनोद तावडे म्हणाले, ” विधानसभेच्या निवडणुकीत महायुती जिंकेल आणि महायुतीचा मुख्यमंत्री होईल. भारतीय जनता पक्षात ज्या नावाची चर्चा मुख्यमंत्रिपदासाठी होते. ते कधी मुख्यमंत्री होत नाहीत. हे पक्क लक्षात ठेवा. काही काळजी करू नका. तुम्हाला राजस्थानचे भजनलाल शर्मा माहिती होते?, मोहन यादव माहिती होते? ओडिशाचे माहिती होते का? त्यामुळे माझ्या नावाची चर्चा झाली ना? याचा अर्थ मी नक्की होणार नाही हे ठरवा. बाकी बघू “, असे विनोद तावडे यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करावा, अशी आग्रही मागणी उद्धव ठाकरे यांनी लावून धरली होती. पण काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने त्याकडे लक्ष दिले नाही. दुसरीकडे महायुतीनेही मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत मौन बाळगले.
महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल? याबाबत राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर नेमकं कोण मुख्यमंत्री होते? याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.