Parvati Assembly Election 2024 | मार्केटयार्डच्या विकासाचे आबा बागुल यांच्याकडून आश्वासन; म्हणाले – “मायबाप जनतेच्या आशीर्वादाने निवडून येणारच”

पुणे: Parvati Assembly Election 2024 | पर्वती विधानसभा मतदारसंघात यंदा तिरंगी निवडणूक पाहायला मिळणार आहे. भाजपकडून माधुरी मिसाळ (Madhuri Misal), शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून अश्विनी कदम (Ashwini Kadam) तर अपक्ष उमेदवार आबा बागुल (Aba Bagul) यांच्यात मुख्य लढत पाहायला मिळणार आहे.
दरम्यान मंगळवार (दि.५) अपक्ष उमेदवार आबा बागूल यांनी पर्वतीमधील माता-भगिनींसह नागरिकांची घरोघरी जाऊन भेटीगाठी घेतल्या. यावेळी सर्वांनी बागूल यांना विजयी करण्याचा दृढ विश्वास व्यक्त केला. “आबा तुम्ही, ‘पर्वती’चे हिरा आहात, आणि तुम्हाला निवडणूक चिन्हही ‘हिरा’ मिळाले आहे.” हा शुभसंकेत असल्याच्या भावना नागरिकांनी व्यक्त केल्या.
बागूल म्हणाले, ” नागरिकांच्या प्रतिसादामुळे विजयाचा आत्मविश्वास द्विगुणित झाला आहे. आता एकच निर्धार विजयाचा आहे, मायबाप जनतेच्या आशीर्वादाने निवडून येणारच.”
दरम्यान बागूल यांनी सकाळी फूल व तरकारी बाजाराला भेट दिली. येत्या सहा महिन्यांत वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. तसेच बाजारात आलेल्या शेतकऱ्यांसाठी विश्रांती कक्ष, खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांसाठी लगेज काउंटर आदी सुविधा उपलब्ध करून देण्याची ग्वाहीही त्यांनी दिली. यावेळी गाळेधारकांसह भाजी खरेदीसाठी आलेल्यांनी आबांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या.
मार्केटयार्ड परिसराचा विकास तुमच्यामार्फत व्हावा अशी इच्छाही व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. मार्केटयार्ड भेटीनंतर बागूल यांनी संभाजी नगर, चव्हाण नगर, शंकर महाराज वसाहत येथे घरोघरी जाऊन नागरिकांची भेट घेतली.