Congress On Rebels In Pune | पुण्यातील काँग्रेसच्या बंडखोरांना 24 तासांचा अल्टिमेटम, ‘माघार घ्या अन्यथा कठोर कारवाई’, शहराध्यक्षांनी बजावली नोटीस

पुणे: Congress On Rebels In Pune | आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर महायुती (Mahayuti), महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi), मनसे (MNS) यांच्यासह इतर पक्षांकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. अनेक मतदारसंघात बंडखोर पाहण्यास मिळाले. यामुळे वरिष्ठ नेत्यांना बंडखोर उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली.
(दि.४) उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस होता. त्यावेळी अनेक ठिकाणी उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले. पण पुणे शहरातील कसबा, पर्वती आणि शिवाजीनगर या तीन विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतील बंडखोर नेत्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलेले नाहीत . यामुळे बंडखोरीचा फटका महाविकास आघाडीतील उमेदवाराला अधिक बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
त्यामुळे आता काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे (Arvind Shinde) यांनी पक्षाच्या बंडखोर उमेदवारांना चोवीस तासांची मुदत देणारी नोटीस बजावली आहे. अजूनही वेळ गेलेली नाही, या चोवीस तासांमध्ये माघारीचा निर्णय घ्या, अन्यथा कठोर कारवाईस तयार रहा असा इशारा यामध्ये देण्यात आला आहे. शिस्तभंगाच्या कारवाईची ही प्रोसिजर असून आघाडी म्हणूनही या बंडखोरांवर कारवाई होईल, असे काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी सांगितले.
पर्वती विधानसभा (Parvati Assembly) मतदार संघातून आबा बागुल (Aba Bagul), कसब्यातून (Kasba Peth Assembly) कमल व्यवहारे (Kamaltai Vyavahare) आणि शिवाजीनगर (Shivaji Nagar Assembly) मधून मनीष आनंद (Manish Anand) यांनी बंडखोरी करत अपक्ष फॉर्म भरला आहे. या बंडखोरांना आघाडीतील अन्य कोणताही पक्ष प्रवेश देणार नाही किंवा महापालिकेच्या (PMC Election) येत्या निवडणुकीत उमेदवारी देणार नाही असे सर्व पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
बंडखोर उमेदवारांबरोबर पक्षाचे जे पदाधिकारी, कार्यकर्ते असतील त्यांच्यावरही पक्षाच्या वतीने अशीच कारवाई केली जाईल असे यावेळी सांगण्यात आले. शिवाजीनगरमधील पक्षाचे बंडखोर उमेदवार मनिष आनंद यांच्या पत्नी पूजा मनिष आनंद (Puja Manish Anand) काँग्रेसच्या महिला शहराध्यक्ष आहेत.
त्यांच्याकडून लेखी खुलासा मागवण्यात आला आहे, पती मनिष आनंद यांच्याबरोबर प्रचार करणार असाल तर पदाचा, पक्षाचा राजीनामा द्यावा अन्यथा बडतर्फ केले जाईल असे त्यांना कळवण्यात आल्याची माहिती शिंदे यांनी दिली आहे.