Pune Police Arrest Tadipar Criminals | पुणे: तडीपार गुंडांचा शहरातच मुक्काम ! एकाच दिवशी 3 तडीपार गुंड जेरबंद

Tadipar (1)

पुणे: Pune Police Arrest Tadipar Criminals | त्यांच्या गुंडगिरीला आळा घालण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी त्यांच्यावर तडीपारीची कारवाई करतात. असे असेल तरी काही दिवसातच हे गुंड पुन्हा हद्दीमध्ये येऊन आपली गुंडगिरी सुरु ठेवत असल्याचे दिसून येते. विधानसभा निवडणुका (Maharashtra Assembly Election 2024) निर्धोकपणे व्हाव्यात, यासाठी गुंडावर कारवाई करण्याची मोहिम पोलिसांनी सुरु ठेवली आहे. त्यातून एकाच दिवसात तीन गुंड हे तडीपारीचा भंग करुन शहरात रहात असल्याचे दिसून आले.

ऋषिकेश ऊर्फ भावड्या बबन धिवार (वय २३, रा. म्हसोबा चौक, दत्तवाडी) याला परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त संभाजी कदम (DCP Sambhaji Kadam) यांनी पुणे शहर, पिंपरी चिंचवड व पुणे जिल्ह्यातून २ वर्षांसाठी तडीपार केले होते. त्यांच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न, मारामारी, आर्म अ‍ॅक्टखाली गुन्हे दाखल आहेत. याबाबत पोलीस अंमलदार राकेश राजेंद्र क्षीरसागर यांनी पर्वती पोलीस ठाण्यात (Parvati Police Station) फिर्याद दिली आहे.

ऋषिकेश धिवार याला तडीपार केले असताना तो सिंहगड रोडवरील (Sinhagad Road Pune) भंडारी हॉटेलसमोर थांबला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी २ नोव्हेंबर रोजी पहाटे अडीच वाजता भंडारी हॉटेल येथे जाऊन धिवार याला पकडले.

कृणाल ऊर्फ फावड्या संजय देशमुख (वय २२, रा. हवालदार मळा, दशरथनगर, विश्रांतवाडी) याला २२ जून २०२३ पासून २ वर्षासाठी तडीपार करण्यात आले होते. असे असताना तो विश्रांतवाडी येथील बी आर टी बस स्टॉपवर शनिवारी मध्यरात्री मिळाला. याबाबत पोलीस हवालदार कृष्णा सरदार माचरे यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात (Vishrantwadi Police) फिर्याद दिली आहे.

अजयसिंग लक्ष्मणसिंग भोंड (वय २४, रा. अशोकनगर, मागीरबाबा चौक, येरवडा) याला ८ एप्रिल २०२३ पासून २ वर्षांसाठी पुणे शहर, पिंपरी चिंचवड व पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले होते. असे असताना तो तडीपार आदेशाचा भंग करुन अशोकनगर येथील मागीरबाबा चौकात आला होता. पोलिसांनी त्याला पकडून प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.