Ladki Bahin Yojana | लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचे पैसे कधी मिळणार? मुख्यमंत्री शिंदेनी दिली माहिती; म्हणाले – ” योजनेचे पैसे कोड ऑफ कंडक्टमध्ये अडकू नयेत, म्हणून…”

मुंबई: Ladki Bahin Yojana | आगामी विधानसभा निवडणूक (Maharashtra Assembly Election 2024) डोळ्यासमोर ठेऊन सुरु केलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सध्या राज्यभर चर्चेत आहे. महायुती सरकारने (Mahayuti Govt) दरमहा पात्र महिलांच्या खात्यात १५०० रुपये देण्याची तरतूद केली आहे.
ही योजना लागू झाल्यापासून लाडक्या बहिणींच्या खात्यावर नोव्हेंबर महिन्यापर्यंतचे पैसे जमा झाले आहेत. लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचे पैसे कधी मिळणार अशी चर्चा सुरु असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी याबाबत भाष्य केले आहे.
माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “लाडकी बहीण योजनेचे पैसे कोड ऑफ कंडक्टमध्ये अडकू नयेत, म्हणून आम्ही नोव्हेंबर महिन्याचे पैसेही ऑक्टोबर महिन्यातच देऊन टाकले. मी आता आपल्याला सांगतो की, २० नोव्हेंबरला निवडणूक आहे. २३ नोव्हेंबरला निकाल आहे. यानंतर, याच नोव्हेंबरमध्ये आम्ही डिसेंबरचे पैसे देणार. कारण आमचा हेतू स्पष्ट आहेत. आम्ही देणारे लोक आहोत घेणार नाही.”
ते पुढे म्हणाले, ” लाडक्या बहिणी यांना माफ करणार नाहीत. अडथळे निर्माण करणाऱ्यांना त्या नक्कीच जोडे दाखवतील आणि या सावत्र भावांपासून त्या निश्चितपणे सजग आहेत. एवढेच नाही तर, आम्ही केवळ १५०० रुपयांवर थांबणार नाही, आशिर्वाद मिळाला तर आम्ही ते आणखी वाढवू. माझ्या बहिणींना लखपती बनवण्याचे आमचे स्वप्न आहे”, असेही शिंदे यांनी म्हटले आहे.