Sharad Pawar On Dilip Walse Patil | दिलीप वळसे-पाटलांच्या पराभवासाठी शरद पवारांकडून कानमंत्र; म्हणाले – ‘तुम्ही गाफील राहू नका, समोरच्या लोकांना कळलं आहे की…’

Sharad Pawar - Dilip Walse Patil

पुणे : Sharad Pawar On Dilip Walse Patil | राष्ट्रवादीच्या फुटीनंतर आंबेगावचे (Ambegaon Assembly Election 2024) आमदार आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांची साथ सोडत अजित पवारांसोबत जाणं पसंत केलं. त्यानंतर आता वळसे पाटलांना विधानसभेला पराभूत करण्यासाठी शरद पवारांनी देवदत्त निकम यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. आज देवदत्त निकम आणि कार्यकर्ते दिवाळीनिमित्त शरद पवारांच्या भेटीला गेले असता त्यांनी निवडणूक जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला आहे.

शरद पवार म्हणाले, ” देवदत्त निकम (Devdatta Nikam) यांच्या रुपाने तुम्हाला एक सक्षम नेतृत्व मिळालं आहे. तुम्ही सर्व आत्मविश्वासाने भक्कम आहात. मात्र तुम्ही गाफील राहू नका. कारण समोरच्या लोकांना कळलं आहे की तुम्ही मनात आणल्यावर काय करू शकता. त्यामुळे ते सर्व ताकदीने साधन-संपत्ती वापरणार आहेत, सत्तेचा वापर करणार आहेत. तुम्ही सर्व फाटक्या खिशाचे असला तरी प्रामाणिक आणि निष्ठावान आहात.

तुम्ही सर्वांनी ही निवडणूक चिकाटीने लढली तर यश मिळेल, याबाबत माझ्या मनात शंका नाही. मात्र अति विश्वासाने या निवडणुकीला सामोरे जाऊ नका. आपली सुरुवात एका मतापासून आहे आणि एकापासून सुरुवात करून शंभरातील सत्तरचा आकडा आपल्याला गाठायचा आहे. या पद्धतीने विचार करून निवडणुकीला सामोरे जा,” असा कानमंत्र शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.

दिलीप वळसे पाटलांवर निशाणा साधताना ते म्हणाले, “दिलीप वळसे पाटील यांचे वडील दत्तात्रय वळसे पाटील हे माझे जवळचे सहकारी होते. त्यांनी शेवटपर्यंत माझी प्रामाणिकपणे साथ दिली. त्यांनीच माझ्या मुलाला तुमच्या कार्यालयात काम करण्याची संधी द्या, अशी विनंती केली.

त्यानुसार मी दिलीप वळसे पाटलांना माझ्यासोबत ठेवलं, नंतर आमदारही आणि विविध खात्यांचं मंत्री केलं. तसंच देशाच्या साखर उद्योगाशी संबंधीत संस्थेचं अध्यक्षपद, रयत शिक्षण संस्थेतही काम करण्याची संधी दिली. मात्र त्यांनी काय केलं? त्यांनी जो निर्णय घेतला तो सामान्य जनतेला आवडलेला नाही,” असे म्हणत त्यांनी देवदत्त निकम यांना ताकद देण्याचे आवाहन केले आहे.