Maharashtra Assembly Election 2024 | ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राज्यात 7 ते 8 सभा घ्याव्या लागतात हे…’, सुप्रिया सुळेंचा विरोधकांना टोला

पुणे : Maharashtra Assembly Election 2024 | राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून २३ नोव्हेंबर २०२४ रोजी मतमोजणी होणार आहे. मतदानाची तारीख जवळ येत असल्याने आता सर्वच पक्षांनी निवडणूक प्रचाराची जोरदार तयारी केलेली आहे. लोकसभेला भाजपला (BJP) फटका बसला होता. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने रणनीती आखत प्रचार करण्याचे ठरवले आहे.
त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे राज्यात एकूण ८ प्रचार सभा घेणार आहेत. त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) हे २० प्रचार सभांना हजेरी लावणार आहेत, अशी माहिती आहे.
केंद्रात २०१४ पासून मंत्री असलेला मराठमोळा चेहरा नितीन गडकरी (Nitin Gadkari) हे संपूर्ण राज्यात एकूण ४० सभा घेणार आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे सध्या राज्य भाजपाचा चेहरा आहेत. त्यामुळे ते सर्वाधिक ५० प्रचार सभा घेणार आहेत.
तर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) हे ४० प्रचार सभा घेणार आहेत. याशिवाय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देखील तब्बल १५ प्रचार सभांना संबोधित करतील, अशी माहिती आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या (Sharad Pawar NCP) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी खोचक टोला लगावला आहे.
” पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ७ ते ८ सभा घ्याव्या लागतात हे महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनतेचा विजय आहे”, असे भाष्य सुप्रिया सुळे यांनी केले आहे.