Uttam Nagar Pune Crime News | सोसायटीच्या सभासदांना हत्यारांचा धाक दाखवून कोरे चेक घेऊन कोर्या कागदावर सह्या घेणार्या बापुसाहेब धावडे याच्यासह 19 जणांवर गुन्हा दाखल
10 इमारतींचे 70 टक्के बांधकाम झाल्यानंतर परिसरात येण्यास केला मज्जाव
पुणे : Uttam Nagar Pune Crime News | विकासकाबरोबर विकसन करार केल्यानंतर बिल्डरने त्यातील फ्लॅट विक्री करुन त्या पैशांमधून १० इमारतींचे ७० टक्के बांधकाम केले. त्यानंतर जागा मालकाने प्रकल्पाचे काम जबरदस्तीने बंद पाडले. सोसायटीचे सभासद सदनिकांची पाहणी करण्यासाठी गेले असताना जागा मालक व त्याच्या साथीदारांनी त्यांना घेराव घालून अडकून ठेवले. हत्याराचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देऊन २ कोटी रुपये द्या त्यानंतर फ्लॅटचा ताबा घ्या व काम करा, असे धमकावून २ कोरे चेक व २ कोरे कागदावर सह्या घेण्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत विजय द्वारकाप्रसार सिलेवान (वय ५१, रा. कोंढवे धावडे) यांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी बापुसाहेब धावडे, वैशाली बापुसाहेब धावडे, अनुराधा धावडे, अभिजित धावडे, भालचंद्र धावडे, अरुणा धावडे, अजिंक्य धावडे, संजय धावडे, माधवी धावडे, मयुर धावडे, आकाश धावडे, श्रीकांत धावडे, संध्या धावडे, सोहम धावडे, सुधीर धावडे, सारीका धावडे, सचिन धावडे, विनायक धावडे (सर्व रा. कोंढवे धावडे) यांच्यावर गुन्हा दाखल आहे. हा प्रकार कोंढवे धावडे येथील सर्व्हे नं. ४, हिस्सा नं. ५ येथे २०१६ ते १ सप्टेबर २०२४ दरम्यान घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जागा मालक बापुसाहेब धावडे याने चिंतामणी कन्स्ट्रक्शन तर्फे महेश रामचंद्र तिखे यांना विकसन करारनामा व कुलमुखत्यार पत्राने विकसन करण्याकरीता जागा दिली होती. त्यानंतर या जागेवर १० इमारतीचे सुमारे ७०टक्के बांधकाम झाले. या इमारतींचे फ्लॅट फिर्यादीसह इतरांना विक्री करुन त्यातून जमा झालेला पैसा इमारतींचे बांधकामासाठी वापरला. चिंतामणी कन्स्ट्रक्शनकडून महेश तिखे यांनी प्रकल्पातील कराराप्रमाणे जागा मालकांना पैसे दिलेले असताना तसेच त्यांच्या हिस्स्याला येणारे फ्लॅट न विकता प्रकल्पामध्ये शिल्लक ठेवलेले असतानाही २०१६ मध्ये बिल्डर तिखे यांचेकडून अधिक आर्थिक लाभ मिळविण्याच्या उद्देशाने जागा मालक धावडे याने प्रकल्पाचे बांधकाम हत्याराचा धाक दाखवून बंद पाडले.
फिर्यादी व इतर फ्लॅटधारक यांनी श्री विष्णु नारायण कॉम्प्लेक्स सहकारी देखभाल संस्था मर्यादित या सोसायटीची नोंदणी केली. जागा मालकाच्या भांडणास कंटाळून तिखे यांनी प्रकल्प आहे त्या स्थितीत सोसायटीच्या ताब्यात दिला. दरम्यानच्या काळात सोसायटीने उर्वरित बांधकाम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा सुद्धा आरोपींनी काठी, कोयते, विळा अशी हत्यारे घेऊन वेळोवेळी अंगावर धावून येऊन जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेनंतर फिर्यादी व सोसायटीतील सभासद या प्रकल्पामध्ये आमच्या मालकीच्या सदनिकांची पाहणी करण्याकरीता गेले होते. त्यावेळी आरोपींनी त्यांचे हातात काठी, कोयते, विळा अशी हत्यारे घेऊन त्यांच्या सभोवती घेराव घालून त्यांना अडकवून ठेवले. त्यावेळी आरोपीच्या कुटुंबियांशी तडजोडीबाबत बोलत असताना त्यांनी हत्यारांचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. २ कोटी रुपये द्या व त्यानंतर फ्लॅटचा ताब घ्या व काम करा, असे धमकावले. फिर्यादीचे बॅगेतील सोसायटीच्या बँक खात्याचे चेकबुकमधील २ कोरे चेक व २ कोरे कागदावर फिर्यादीला सह्या करण्यास भाग पाडून त्यांनी ते ताब्यात घेतले. त्यानंतर धावडे कुटंबियांनी फिर्यादी व सोसायटी सदस्यांची सुटका केली.
अवेध मार्गाने अधिकचा आर्थिक लाभ मिळवण्याचे उद्देशाने प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हिंसाचार करण्याची धमकी देऊन जबरदस्ती करुन प्रकल्पातील पूर्ण व अपूर्ण १० इमारती बेकायदेशीरपणे स्वत:च्या कब्जात व देखरेखीखाली ठेवून त्या बळकावून त्यापासून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळविणे चालू आहे असे फिर्यादीत म्हटले आहे. उत्तमनगर पोलीस अधिक तपास करीत आहेत.