Pune Politics News | पुणेकर ‘मन’ से कोणाला मतदान करणार? राजकीय वर्तुळात चर्चा; 8 पैकी 4 मतदारसंघात मनसेचे उमेदवार

पुणे : Pune Politics News | शहरातील ८ विधानसभा मतदारसंघापैकी सद्यस्थितीत ८ पैकी ५ ठिकाणी भाजपचे आमदार, २ ठिकाणी अजित पवार गटाचे (Ajit Pawar NCP) आमदार, तर एका ठिकाणी काँग्रेसचा (Congress) आमदार आहे. दरम्यान ८ पैकी ४ मतदारसंघात मनसेचे उमेदवार (MNS Candidate) जाहीर केले आहेत.

शहरातील कोथरूड, कसबा, खडकवासला आणि हडपसर या चार विधानसभा मतदारसंघांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उमेदवार दिले आहेत. पण या मतदारसंघात पक्षाची ताकद कुठे आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यामुळे पुणेकर ‘मन’ से कोणाला मतदान करणार हा चर्चेचा मुद्दा आहे. कोथरूडमधून किशोर शिंदे, हडपसरमधून साईनाथ बाबर, खडकवासला मधून मयूरेश वांजळे, कसब्यातून गणेश भोकरे हे निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत.

कसबा विधानसभा निवडणूक धंगेकरांच्या विजयाने चर्चेत आली होती. हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. यंदाही हेमंत रासने विरोधात रवींद्र धंगेकर अशी मुख्य लढत पाहायला मिळणार आहे. अशातच तरुण सामाजिक कार्यकर्ते गणेश भोकरे यांना मनसेकडून निवडणूक लढवण्याची संधी मिळाली आहे. भोकरेंचा तसा मतदारसंघात दांडगा संपर्क पाहायला मिळत आहे. मात्र त्यांची राजकीय वाटचाल आताच सुरु झाली आहे.

खडकवासला विधानसभा मतदार संघातून दिवंगत आमदार रमेश वांजळे यांचे चिरंजीव मयुरेश वांजळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. रमेश वांजळे २००९ च्या निवडणुकीत प्रचंड मताधिक्याने निवडून आले होते. खडकवासला मतदार संघात वांजळेंचा मोठा चाहता वर्ग आहे. आता मयुरेश वांजळेंच्या माध्यमातून पुन्हा मनसेचा झेंडा फडकेल का? हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.

कोथरूड विधानसभा मतदार संघातून किशोर शिंदेनी २०१९ ची निवडणूक लढवली होती. तेव्हा चंद्रकांत पाटलांनी २० ते २५ हजारांच्या फरकाने त्यांचा पराभव केला होता. इतर पक्षांनी तेव्हा शिंदेंना पाठिंबा दिला होता. आताही मनसेला कोथरूमधून निवडून येण्यासाठी ताकद लावावी लागणार आहे. आता या लढतीत चंद्रकांत मोकाटे यांचा आघाडीकडून उतरले आहेत. ही लढत तिरंगी होणार असल्याने मनसे समोर सध्या २ उमेदवारांचे आव्हान आहे.

तर हडपसर विधानसभेतून एकदाही आमदारकी न लढवलेल्या साईनाथ बाबर यांना मनसेने संधी दिली आहे. इथंही तिरंगी लढत होणार असली तरी शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्या मुख्य लढतीने लक्ष वेधले आहे.