Murlidhar Mohol On Harshvardhan Patil | हर्षवर्धन पाटील यांनी ‘त्या’ पैशांचे काय केले? अजित पवारांच्या विधानानंतर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे मोठे वक्तव्य; म्हणाले – ‘… तर हर्षवर्धन पाटील यांची चौकशी करू’

पुणे : Murlidhar Mohol On Harshvardhan Patil | विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भाजपला रामराम करत राष्ट्रवादी शरद पवार गटात (Sharad Pawar NCP) प्रवेश केला. त्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून त्यांना उमेदवारीही घोषित झाली. त्यानंतर इंदापूरमध्ये विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) यांचा राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून (Ajit Pawar NCP) उमेदवारी अर्ज भरताना उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. यावेळी झालेल्या सभेत अजित पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांच्यावर निशाणा साधला होता.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभेत बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी त्या पैशांचे काय केले? असा प्रश्न जाहीर सभेत उपस्थित केला होता. त्यानंतर आता केंद्रीय सहकार व नागरी विमान उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनीही याबाबत महत्वाचे विधान केले आहे.

हर्षवर्धन पाटील यांच्या सहकारी संस्थांना केंद्र सरकारने ३०० कोटी रुपये निधी म्हणून दिले, त्याचा त्यांनी योग्य वापर केला तर ठीक अन्यथा त्या पैशांच्या विनियोगाची चौकशी करण्यात येईल, असा इशारा मुरलीधर मोहोळ यांनी दिला आहे.

ते म्हणाले, ” मदत करताना किंवा कर्ज उपलब्ध करून देताना सहकार मोठा झाला पाहिजे, असाच दृष्टिकोन असतो. ते आमच्याबरोबर होते म्हणून पैसे दिले असे नाही आणि ते आता दुसरीकडे गेले म्हणून चौकशी होईल असेही नाही. मात्र मिळालेल्या मदतीचा योग्य विनियोग करण्याची जबाबदारी त्यांची आहे, तसे झाले नसेल तर मात्र चौकशी करावी लागेल”, असे केंद्रीय सहकार व नागरी विमान उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी म्हंटले आहे.