Maval Assembly Election 2024 | बाळासाहेब नेवाळेंचा भाजपला रामराम; मावळात राजकीय समीकरण बदलत असताना भाजपला आणखी एक धक्का

मावळ : Maval Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर मावळात भाजपला आणखी एक धक्का बसला आहे. प्रदेश सहकार आघाडी सहसंयोजक पदावर नियुक्ती करण्यात आलेले बाळासाहेब नेवाळे (Balasaheb Newale) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तालुक्यातील राजकीय समीकरण बदलत असताना नेवाळे यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. नेवाळे हे दूध संघाचे अध्यक्ष देखील होते. शेतकरी वर्ग त्यांच्या मागे मोठ्या प्रमाणात आहे.
नेवाळे यांनी भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे राजीनामा दिला आहे. मावळ विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सुनील शेळके यांना उमेदवारी जाहीर होताच तालुक्यात भाजपच्या गोटात असंतोष पसरला होता. त्यामुळे तालुक्यातील वातावरण ढवळून निघाले आहे.
२०१९ च्या विधानसभा निवडणूक प्रचारावेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीतीत एका जाहीर सभेत नेवाळे यांनी भाजप पक्षात जाहीर प्रवेश केला होता. त्यानंतर भाजपने त्यांना राज्य सहकार आघाडी सहसंयोजक पदी नियुक्त केले होते.