Kothrud Assembly Election 2024 | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मध्यस्थीने चंद्रकांत पाटील आणि अमोल बालवडकर यांचे मनोमिलन; कोथरूडमधील भाजपचा मार्ग सुकर (Video)

Devendra Fadnavis-Amol Balwadkar-Chandrakant Patil

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Kothrud Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. कोथरूडमधील बंडखोरी रोखण्यास भाजपला यश आले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भाजप नेते अमोल बालवडकर (Amol Balwadkar) यांची समजूत काढत त्यांची नाराजी दूर केली आहे. त्यामुळे मतदारसंघातील भाजपची (BJP) डोकेदुखी दूर झाली आहे.

कोथरूड विधानसभा मतदारसंघात यंदा भाजपकडून निवडणूक लढण्यासाठी अमोल बालवडकर इच्छुक होते. विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून मतदारसंघातील घरोघरी ते पोहोचले होते. मात्र भाजपने विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना या मतदारसंघातून उमेदवारी घोषित केली. त्यानंतर अमोल बालवडकर नाराज झाल्याचे पाहायला मिळाले.

कोथरूड विधानसभा मतदारसंघात ते बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार अशी चर्चा सुरु होती. त्यामुळे महायुतीची डोकेदुखी वाढली होती. दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनीही बालवडकर यांची भेट घेत त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमोल बालवडकर यांची नाराजी दूर केली आहे.

चंद्रकांत पाटील आणि अमोल बालवडकर यांचे मनोमिलन घडवून आणण्यात फडणवीस यांनी महत्वाची भूमिका पार पाडली. चंद्रकांत पाटील यांनी पेढा भरवत बालवडकर यांची समजूत काढली आहे. दरम्यान आता बालवडकर यांनी विधानसभेतून माघार घेतली असून चंद्रकांत पाटील यांना पाठिंबा दिला आहे.

याबाबत अमोल बालवडकर म्हणाले, ” प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः या तत्त्वावर भारतीय जनता पक्ष निष्ठेने जनतेची सेवा करत आला आहे. मी या पक्षाचा एक भाग असल्याचा मला प्रचंड अभिमान आहे. त्यामुळे जनतेची सेवा करणे हा उद्देश नेहमीच राहिला आहे आणि तो एक लोकप्रतिनिधी या नात्याने पूर्ण देखील केला आहे.

परंतु आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कोथरूड विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी निवडणूक लढवणार अशी इच्छा व्यक्त केली होती. सुरुवातीपासून भारतीय जनता पक्षाच्या वतीने मला उमेदवारी मिळावी यासाठी मी आग्रही होतो. परंतु भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आदरणीय श्री. चंद्रकांत दादा पाटील यांना संधी मिळाली, काही गोष्टींवरून आमचे मतभेद होते.

मात्र आज ते मतभेद माझे नेते आणि राज्याचे भारतीय जनता पार्टीचे सक्षम उपमुख्यमंत्री आदरणीय श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून दूर झाले आहेत. त्यामुळे आज कोथरूड विधानसभा मतदारसंघातून माझी उमेदवारी मी मागे घेत असून मा. चंद्रकांतदादा पाटील यांना पाठिंबा देत आहे.

आगामी निवडणुकीत पुन्हा एकदा कोथरूड मध्ये भाजपाचा झेंडा फडकावण्यासाठी मी कटिबद्ध राहील आणि चंद्रकांत दादांच्या प्रचारार्थ मेहनत घेईल. विशेष म्हणजे या विधानसभेच्या सर्व प्रक्रियेत माझ्या सोबत असणारी जनता आणि कार्यकर्ते यांना विचारूनच मी हा निर्णय घेतला आहे. शेवटी जनतेच्या शब्दाबाहेर मी कधीच जाणार नाही आणि येणाऱ्या काळात जनतेच्या हितासाठी अहोरात्र झटत राहील “, अशी भावना बालवडकर यांनी व्यक्त केली.