Kondhwa Pune Crime News | 1 कोटी 16 लाखांच्या फसवणूक प्रकरणी टिकटॉक स्टार मौलाना अब्दुल रशीद ऊर्फ मिफताही कलंदर खानचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला

पुणे : Kondhwa Pune Crime News | साद मोटर्स या गाड्या खरेदी विक्रीच्या व्यवसायात गुंतवणूक केल्यास दरमहा २ ते ३ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून ९ जणांची १ कोटी १६ लाख रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने टिकटॉक स्टार मौलाना अब्दुल रशीद ऊर्फ मिफताही कलंदर खान याचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावला.
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी. व्ही. नागरथना आणि न्यायमूर्ती एन. कोटीश्वरसिंह यांनी हा निर्णय दिला. याबाबत निसार बाबुलाल शेख (वय ५५, रा. चिंतामणीनगर, हडपसर) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी रफिक कलंदर खान (वय ४४), सनोबर ऊर्फ सौदा रफिक खान (वय ४०), इसा रफिक खान (वय २३), मौलाना अब्दुल रशीद ऊर्फ मिफताही कलंदर खान (वय ४८, सर्व रा. भाग्योदयनगर, कोंढवा खुर्द) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर मौलाना रशीद खान याने अटकपूर्व जामीना साठी सत्र न्यायालयात धाव घेतली होती. सत्र न्यायालय व मुंबई उच्च न्यायालयाने अर्ज फेटाळल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात त्याने अपील केले होते.
गुंतवणूकदारांच्या वतीने अॅड. अमेय सिरसीकर यांनी सर्वोच्च न्यायालयात असा युक्तिवाद केला की, मौलाना अब्दुल रशीद खान हा मुख्य आरोपी आहे. तो सोशल मीडियावर मुस्लिम समाजाचा प्रेरणादायी वक्ता असल्यामुळे तसेच त्याचे सोशल मीडियावर लाखो फॉलोवर असल्यामुळे त्याने गुंतवणुकदारांना सहजपणे भुरळ घातली. गुंतवणुक करण्यात उद्युक्त करुन फसवणूक केली आहे. तसेच गुंतवणुकीपैकी तब्बल २१ लाख रुपये अब्दुल रशीर कलंदर खान व त्याच्या कुटुंबाच्या बँक खात्यावर वर्ग झाले आहेत.
गुंतवणूकदारांचे वकील ॲड.अमेय सिरसीकर यांचा युक्तिवाद मान्य करून सर्वोच्च न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला.
सर्वोच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यामुळे आता मौलाना अब्दुल रशीद उर्फ मिफताहि कलंदर खान यांना केव्हाही अटक होऊ शकते.
गुन्हा दाखल होवून चार महिने उलटून गेल्यानंतरही एक ही आरोपी अटक नाही पोलीस आरोपीला कधी अटक करणार आम्ही चार महीने पासून पोलिस ठाण्यात चकरा मारत आहोत. तपासी अधिकारी म्हणतात तुम्हीच आरोपीचा शोध घेवून आम्हाला सांगा आम्ही अटक करू असे फिर्यादी निसार शेख यांनी सांगीतले. याकडे कोंढवा परिसरातील गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.