Kasba Peth Assembly Election 2024 | ‘आईची पक्षनिष्ठा भाजप नेते विसरले’, पुण्यात उमेदवारीवरून नाराजीनाट्य; ‘भाजपला हिंदुत्ववादी सरकार हवंय, पण हिंदुत्ववादी कार्यकर्ता नकोय’, इच्छुक उमेदवारांची खंत

पुणे : Kasba Peth Assembly Election 2024 | आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. उमेदवारांच्या याद्या जाहीर होत आहे. त्यामुळे ज्यांना उमेदवारी मिळाली नाही ते नेते नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत. भाजपने काल उमेदवारांची एक यादी जाहीर केली (BJP Candidate).
त्यामध्ये कसबा विधानसभा मतदारसंघात हेमंत रासने (Hemant Rasane) यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे मतदारसंघातील इच्छुक नेते कुणाल टिळक (Kunal Tilak), पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे (Dheeraj Ghate) नाराज झाल्याचे चित्र आहे. पक्षाकडून तिकिट न मिळाल्याने धीरज घाटे नाराज झालेत. तुम्हाला हिंदुत्ववादी सरकार हवंय, पण ३० वर्ष हिंदुत्वासाठी देणारा उमेदवार म्हणून नकोय, अशी फेसबुक पोस्ट त्यांनी टाकली आहे.
तर आईची पक्षनिष्ठा भाजप नेते विसरले अशी भावना कुणाल टिळक यांनी व्यक्त केली आहे. कुणाल टिळक म्हणाले, ” आज भाजपाचा कसबा पेठेतील उमेदवार घोषित झाला आहे. मी मागच्या दीड वर्ष चांगल्याप्रकारे काम करून उमेदवारीची मागणी पक्षाला केली होती. निवडणुकीमुळे खंत वाटते. नाराजी नसली तरी पक्षाचे काम करणार आहे.
फक्त आईने जे पक्षनिष्ठेचे काम पक्षासाठी केले ते भाजपा नेते विसरले का, टिळकांना भाजपा विसरलं का असा प्रश्न पडला आहे. मी कुठे कमी पडलो याचा मी अभ्यास करेन. पक्षाकडून मी माहिती घेईन. पुढच्यावेळी ती चूक दुरुस्त करेन. उमेदवार निवडीत निकष काय लावले हे माहिती नाही. पक्षाकडून मला काही निरोप आला नाही”, असं त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, ” तसेच चिंचवडमध्ये तुम्ही कुटुंबाला दोनदा उमेदवारी देता मग टिळक कुटुंबाला उमेदवारी का देत नाही हा प्रश्न आहे. मी वरिष्ठांकडे प्रश्न घेऊन जाईन. आम्हाला काही स्पष्टता आली तर बदल काय करायचे हे कळेल.
उमेदवार निवडीआधी मी पक्षाला सांगितले होते, यावेळी भाजपाला खूप जिंकण्याची आशा आहे. ज्याप्रकारे संघटनेने काम केले, लोकांपर्यंत पोहोचलो त्यामुळे भाजपाच्या बाजूने वातावरण होते. मला पक्ष जी जबाबदारी देईल ते मी करेन. उमेदवार निवडून आणण्याकरिता प्रयत्न करेन”, असंही कुणाल टिळक यांनी स्पष्ट केले.
या नाराजीनाट्यावरून कसबा पेठ मतदारसंघात भाजपाला येत्या काळात फटका बसणार का? अशी चर्चा आता होऊ लागली आहे. मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाने हेमंत रासने यांना उमेदवारी दिली. त्यावेळी काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांनी या मतदारसंघात विजय मिळवला. आता पुन्हा धंगेकर विरुद्ध रासने अशी लढत पाहायला मिळणार आहे.