Hadapsar Pune Crime News | कॉपीराईट कायद्याचा भंग करुन बनावट मीठाची विक्री करणार्‍या दुकानदारावर गुन्हा दाखल

Copyright

पुणे : Hadapsar Pune Crime News | चिमुटभर मीठ जेवणात चव आणते. पण हे मीठच भेसळयुक्त असेल तर, कदाचित तुम्ही कितीही चांगला स्वयंपाक बनविला तरी त्यामुळे तो आळणी होऊ शकतो. हडपसर पोलिसांनी कॉपीराईट कायद्याचा भंग करुन मीठाची विक्री करणार्‍या एका दुकानदारावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत साजीद असगरअली अन्सारी (वय ३४, रा. स्पाईन रोड, भोसरी) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी हिराराम गंगाराम चौधरी (वय २६, रा. सोलापूर रोड, हडपसर) आणि नरेंद्रसिंग याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत हडपसरमधील विठ्ठल मंदिराशेजारील बालाजी ट्रेडर्स या दुकानात रविवारी दुपारी साडेबारा वाजता कारवाई करण्यात आली. (Copyright Case)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना हडपसरमध्ये टाटा नमकच्या नावाने दुसरे मीठ विकले जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पाहणी केली असता बालाजी ट्रेडर्स या दुकानातून भेसळयुक्त टाटा नमक ची विक्री केली जात असल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी बालाजी ट्रेडर्स या दुकानावर छापा घातला. तेव्हा तेथे २० पोत्यांमध्ये टाटा नमक (मीठ) चे ६०० एक किलो चे पुडे आढळून आले. पोत्यामधील मिठाचे पाकिटावरील कव्हर व त्याचे अक्षराचे फॉन्ट पूर्णपणे वेगळे दिसून आले. तसेच त्याच्यावर बॅच नंबर नव्हते. किंमतीमध्ये देखील फरक दिसून आला. ही पाकिटे पूर्णपणे कॉपीराईटचा भंग करुन बनविल्याचे दिसून आले. त्याची विक्री करुन कॉपीराईटचे हक्काचे उल्लंघन करीत असताना दुकानदार मिळून आला. याबाबत हिरामराम चौधरीकडे चौकशी केल्यावर त्याने नरेंद्रसिंग याच्याकडून ही पाकिटे घेतल्याचे सांगितले. सहायक पोलीस निरीक्षक सुशिल लोणकर (API Sushil Lonkar) तपास करीत आहेत.