Deccan Pune Crime News | डेक्कन भागात पोलिसांवर हल्ला करुन पसार झालेल्या दरोडेखोरांपैकी एकाला अटक; पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोन चोरटे जखमी

पुणे : Deccan Pune Crime News | लॉ कॉलेज रस्त्यावर गस्त घालणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांवर हल्ला (Attack On Cops) करुन पसार झालेल्या दरोडेखोरांपैकी एकाला पोलिसांनी पकडले. पोलिसांनी स्वसंरणार्थ केलेल्या गोळीबारात दोन दरोडेखोर जखमी झाले असून, पसार झालेल्या दरोडेखोरांचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.
आसिफ हरूनखान गोलवाल (२४, रा. जंजाळ, जिल्हा परिषद शाळेजवळ, ता. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात शाहरुख कादीरखान पठाण आणि फारुखखान कादीरखान पठाण (रा. जंजाळ, ता. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर) जखमी झाले आहेत. (Deccan Police Station)
याप्रकरणी त्यांचे साथीदार नदीम खान लतीफ खान, फिरोज खान शरीफ खान, नजीम खान सादुखान यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी (दि. २२) मध्यरात्री अडीचच्या सुमारास डेक्कन पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी महेश तांबे आणि गणेश सातव लॉ कॉलेज रोड परिसरात गस्त घालत होते. अभिनव महाविद्यालय परिसरातील जानकी व्हिला बंगल्याजवळ आरोपी गोलवाल आणि साथीदार अंधारात थांबले होते.
गस्त घालणारे पोलिस कर्मचारी तांबे आणि सातव यांनी अंधारात चोरट्यांची हालचाल पाहिली. संशय आल्याने त्यांनी अंधारात चोरट्यांचा शोध सुरू केला. बंगल्याच्या परिसरात दोन चोरटे थांबले होते. तांबे आणि सातव यांनी त्यांची चौकशी सुरू केली. तेव्हा त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा चोरट्यांनी त्यांच्या साथीदारांना हाक मारली. अंधारातून चोरटे तेथे आले त्यांनी तांबे आणि सातव यांच्यावर करवतीने हल्ला चढवला. प्रसंगावधान राखून पोलिस कर्मचारी तांबे यांनी स्वसंरक्षणार्थ चोरट्यांच्या पायाच्या दिशेने पिस्तुलातून गोळीबार केला. पोलिसांशी झटापट करुन चोरटे अंधारात पसार झाले. तांत्रिक तपासात चोरटे छत्रपती संभाजीनगरकडे पसार झाल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर परिसरातील जंजाळ गावातून आरोपी गोलवाल याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याच्याबरोबर असलेले दोन साथीदार गोळीबारात जखमी झाल्याची माहिती मिळाली असून, चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त आयुक्त प्रवीणकुमार पाटील, पोलिस उपायुक्त संदीपसिंग गिल, सहायक आयुक्त साईनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली डेक्कन पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरीषा निंबाळकर, गुन्हे शाखेच्या युनिट एक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद, सहायक पोलिस निरीक्षक कवटीकर, पोलिस उपनिरीक्षक महेश भोसले, अजय भोसले, शुभम देसाई, राहुल मखरे, शिंदे, धनश्री सुपेकर, दरेकर, साेनवणे, साबळे, सागर घाडगे आणि वसीम सिद्दीकी यांनी ही कारवाई केली.