Nawab Malik News | बेरजेच्या राजकारणात नवाब मलिकांना जवळ करण्याचं गणित दडलंय?; भाजपच्या भूमिकेने अनेक प्रश्न अनुत्तरित

मुंबई : Nawab Malik News | मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपामुळे अटकेची कारवाई झाल्यानंतर काही महिन्यांपूर्वी वैद्यकीय कारणास्तव नवाब मलिक हे जामिनावर तुरुंगाबाहेर आले आहेत. तुरुंगाबाहेर येताच नवाब मलिकांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला आपले समर्थन दिले होते. तसेच अधिवेशन काळात ते सत्ताधारी बाकांवरही बसले होते. मात्र गंभीर आरोप असलेले मलिक हे महायुतीसोबत नकोत, अशी भूमिका घेत भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar NCP) यांना पत्र लिहिले होते.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही अजित पवारांना मलिक यांना उमेदवारी द्यायची होती असं कळतं. मात्र मलिक यांच्यावरच्या दाऊद कनेक्शनच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर भाजपने त्यावर तीव्र आक्षेप घेतला. दाऊदशी संबंधित असलेल्या नवाब मलिक यांचे काम भाजप कार्यकर्ते करणाार नाहीत. आमची भूमिका ठाम आहे, असे भाजप नेते आशिष शेलार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
या सर्व घडामोडींवर तोडगा म्हणूनच आता मलिकांच्या कन्या सना मलिक यांना अजित पवारांनी पूर्व मुंबईतील अणुशक्ती नगर मतदारसंघातून तिकीट दिले आहे. आज सकाळी सना मलिक एबी फॉर्मही घेऊन गेल्या. सना यांच्यावर कुठलाही आरोप विरोधकांना करता येणार नाही, असा तर्क अजित पवारांनी मांडला असावा. पण भाजप त्यावर अजूनही पूर्णपणे समाधानी आहे असं वाटत नाही.
नवाब मलिकांवर भाजपचा आक्षेप आहे. विरोधक टीका करीत आहेत. यावर नवाब मलिकांऐवजी सना मलिक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नवाब मलिक ज्या मतदारसंघातून निवडणूक लढतात तिथं मुस्लिम मतं ही निर्णायक आहेत. त्यामुळे त्यांना अडगळीत टाकणं हे अजित पवार आणि पर्यायानं महायुतीला देखील परवडणारं नाही अशी मांडणी राजकीय विश्लेषक करतात. याच बेरजेच्या राजकारणात नवाब मलिकांना जवळ करण्याचं गणित दडल्याची चर्चा आहे.