MVA Seat Sharing Formula | मित्रपक्षाचा महाविकास आघाडीला इशारा; आम्हाला 5 जागा द्या अन्यथा 25 जागांवर लढणार

मुंबई : MVA Seat Sharing Formula | विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. मतदानासाठी काहीच दिवस बाकी आहेत. त्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) काही जागांवरील तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे छोट्या मित्रपक्षांच्या जागावाटपाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
साहजिकच छोट्या पक्षांच्या मनामध्ये चलबिचल निर्माण झाली आहे. महाविकास आघाडीतील छोट्या घटक पक्षांपैकी प्रमुख पक्ष असलेल्या समाजवादी पार्टीने ५ जागा द्या, अन्यथा आम्ही २५ जागांवर निवडणूक लढवणार असा थेट इशाराच दिला आहे.
याबाबतचे सूचक विधान समाजवादी पक्षाचे महाराष्ट्रातील नेते अबू आझमी (Abu Azmi) यांनी केले आहे. उद्यापर्यंत महाविकास आघाडीचे जागावाटप जाहीर झालं नाही तर स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला जाईल, असा इशारा त्यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर दिला आहे.
माध्यमांशी बोलताना अबू आझमी म्हणाले, ” शरद पवार यंच्यापेक्षा मोठा नेता महाविकास आघाडीमध्ये आहे, असं मला वाटत नाही. शरद पवारच आहेत ज्यांच्याशी चर्चा केली जाऊ शकते. मी केवळ त्यांच्याकडे एवढंच सांगण्यासाठी आलो होतो की, मी पाच उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. तुम्ही उत्तर देत असाल तर ठीक आहे नाहीतर माझ्याकडे २५ उमेदवार तयार आहे.
त्यांना मी उमेदवारी देईन. कारण याआधी माझी दोनवेळा काँग्रेसकडून फसवणूक झालेली आहे. कारण हे लोक शेवटच्या एक दोन दिवसांपर्यंत वाट पाहा, वाटा पाहा असं सांगतात आणि शेवटच्या क्षणी फसवणूक करतात”, असा आरोप अबू आझमी यांनी केला आहे.
ते पुढे म्हणाले, ” शरद पवार यांनी मला एक दिवस थांबण्यास सांगितले आहे. जर यांनी तोपर्यंत आम्हाला ५ जागा देण्याची घोषणा केली तर मी महाविकास आघाडीमध्ये राहीन. नाहीतर मी आमचे २५- ३० उमेदवार मैदानात उतरवेन. मग त्यांच काय व्हायचं ते होऊ दे”, असा इशारा अबू आझमी यांनी दिला आहे.