Jayshree Thorat On BJP Leader | भाजप नेत्याच्या आक्षेपार्ह वक्तव्यावर जयश्री थोरात यांचं भाष्य; म्हणाल्या – ‘मी असं काय केलं होतं की माझ्याबद्दल…’

Jayshree Thorat-Sujay Vikhe Patil

संगमनेर : Jayshree Thorat On BJP Leader | भाजपाचे माजी खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी संगमनेर (Sangamner Assembly Constituency) तालुक्यातील धांदरफळ गावात (दि.२५) युवा संकल्प मेळावा घेतला होता. या मेळाव्यात वसंतराव देशमुख (Vasantrao Deshmukh) यांनी बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांची कन्या जयश्री थोरात यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले. त्यामुळे गदारोळ निर्माण झाला आहे.

देशमुख यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी संगमनेर तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्ते रात्री आक्रमक झाल्याचे दिसले. सभेनंतर विखे यांच्या बरोबरचे लोक लोणी गावी परतत असताना त्यांच्या वाहनांची अज्ञातांकडून तोडफोड आणि जाळपोळही करण्यात आली. परिस्थिती आजही तणावाची असल्याची माहिती आहे.

दरम्यान आज (दि.२६) जयश्री थोरात यांनी माध्यमांसमोर येत या सगळ्या प्रकारावर भाष्य केलं आहे. त्या म्हणाल्या, “वसंतराव देशमुख यांनी केलेलं वक्तव्य हे कोणत्याही नेत्याला न शोभणारं आहे. तुम्ही महिलांना राजकारणात ५० टक्के आरक्षण देण्याच्या गप्पा मारता.

परंतु, तुमच्याच पक्षात अशा प्रकारची वक्तव्ये करणारे लोक असतील तर महिलांनी राजकारणात का यावं? मी काय वाईट करत होते? मी केवळ माझ्या वडिलांसाठी राजकारणाच्या मैदानात उतरले होते. युवा संवाद यात्रेद्वारे लोकांना भेटत होते. मी असं काय केलं होतं की माझ्याबद्दल इतकं वाईट बोललं गेलं?”

त्या पुढे म्हणाल्या, ” वसंतराव देशमुख जे काही बोलले ते त्यांच्या वयाला शोभणारं आहे का? ते त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते आणि त्यांनीच अशा गलिच्छ भाषेत खालच्या पातळीवर वक्तव्य केलं. हे त्यांच्या वयाला शोभणारं नाही. विरोधकाला देखील एक पातळी असते, मात्र ते अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन त्यांच्या मुलीच्या, नातीच्या वयाच्या मुलींबद्दल घाणेरडं बोलत होते. हे त्यांना शोभणारं नाही.

माझ्या आजोबांनी यापूर्वी त्यांना एकदा खडसावलं होतं, त्यांना सरळ केलं होतं. आमच्या पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात मोर्चा देखील नेला होता. परंतु, ते आजही तसेच आहेत. अशा माणसाला लोक आपल्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान का देत असतील हाच प्रश्न आहे.

ज्यांनी त्यांना आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान दिले, त्यांच्याबद्दलच मला प्रश्न पडले आहेत. ते नेमका काय विचार करत होते? त्यांनी देशमुख यांना आपल्या कार्यक्रमाचं अध्यक्ष स्थान का दिलं असेल? असा मला प्रश्न पडला आहे”, असे म्हणत जयश्री थोरात यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.