Indapur Assembly Election 2024 | इंदापूरात हर्षवर्धन पाटलांचं टेन्शन वाढलं; पक्षांतर, कारखाना, बंडखोरी पाटलांची अडचण करणार?

इंदापूर : Indapur Assembly Election 2024 | लोकसभा व विधानसभेला गणिते वेगळी राहत असल्याने माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांची नेहमीच कोंडी झाली आहे. त्यामुळे त्यांना अनेकदा पक्षबदल करावा लागला. राज्य पातळीवरील नेता अशी प्रतिमा असताना सातत्याने पक्षबदल झाल्याने पाटील यांची विश्वासार्हता कमी झाली आहे.
गेली अनेक दशकांपासून असलेले राजकीय वैर विसरून हर्षवर्धन पाटलांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला. लोकसभेला खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना तालुक्यातील महत्त्वाच्या नेत्यांनी मदत केली. त्यांचा पाटील यांच्या प्रवेशाला मोठा विरोध होता, मात्र प्रवेश झाल्यावर अनेकांनी पवार गटापासून फारकत घेत विरोधी भूमिका घेतली आहे.
त्यामुळे यंदा इंदापूरमध्ये तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शरद पवार गटात पाटील यांच्या प्रवेशाला प्रवीण माने (Pravin Mane) यांनी प्रखर विरोध केला. मात्र प्रवेश झाल्यावर माने यांनी अलिप्त भूमिका घेऊन विधानसभा निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला व बंडखोरी केली आहे, त्यामुळे ही बंडखोरी जातीय समीकरणात पाटील यांना अडचणीची ठरणार आहे.
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे मागील १० वर्षांपासून मतदारसंघावर लक्ष नसल्याची चर्चा होऊ लागल्याने मतदारसंघावरील पकड कमी झाल्याचे बोलले जात आहे. तालुक्यातील महत्त्वाच्या कर्मयोगी व निरा भीमा सहकारी साखर कारखान्याकडून गेली अनेक वर्षे सातत्याने शेतकरी सभासदांना ऊसाला कमी दिलेला दर व कामगारांचे नियमित होत नसलेले पगार हेदेखील मुद्दे हर्षवर्धन पाटील यांना अडचणीचे ठरणार आहेत.
जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे व कर्मयोगीचे उपाध्यक्ष भरत शहा यांनी आमचा विश्वासघात केल्याचा आरोप पाटील यांच्यावर केला आहे. शब्द देऊनही तो पाळला जात नाही. त्यामुळे मागील विधानसभा निवडणुकीत हिरिरीने काम करणारे जगदाळे व शहा यांनी विरोधी भूमिका घेतली आहे.