Fake GST Bill Scam In Pune | बनावट जीएसटी बिले बनवून बोगस कंपन्यांद्वारे व्यवहार दाखवून 8 हजार कोटींचा कर चुकवेगिरी; जीएसटी गुप्तचर विभागाकडून पर्दाफाश

पुणे : Fake GST Bill Scam In Pune | बनावट जी एस टी फर्म स्थापन करुन बनावट जी एस टी बिल बनवुन वेगवेगळ्या फर्मला पाठवून वस्तूंची विक्री व व्यवहार न करता शासनाचा ५ ते ८ हजार कोटी रुपयांचा कर चुकविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याबाबत जी एस टी गुप्तचर संचालनालयाचे सुचना अधिकारी ऋषिक कालुराम प्रकाश (वय ३९, रा. घोरपडी) यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अशरफभाई इब्राहिमभाई कालावडिया (वय ५०, रा. सुरत, गुजरात), नितीन बर्गे (रा. कामराज नगर, घाटकोपर पू., मुंबई), फैजल मेवावाल (रा. कांबेकर स्ट्रीट, मुंबई), निजामुद्दीन खान (रा. दिवा हायवे, भिवंडी), अमित तेजबहादुर सिंग (रा. उल्हासनगर, मुंबई), राहुल बटुकभाई बरैय्या, कोशिक भुपतभाई मकवाना, जितेंद्र मुकेशभाई गोहेल व इतर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार सप्टेंबर २०१८ ते मार्च २०२४ दरम्यान घडला आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, आरोपीनी संगनमत करुन बनावट जी एस टी फर्म स्थापन केल्या. बनावट बँक खाते व बनावट सिमकार्ड, वेगवेगळ्या कंपनीचे नावाचे बनावट रबरी शिक्के व इतर वस्तुंचा वापर केला. त्याद्वारे बनावट कंपनी तयार करुन या कंपनीच्या मार्फत वस्तुंची विक्री व व्यवहार न करता ते केले असल्याचे दाखवून बनावट जी एस टी बिल बनवून वेगवेगळ्या फर्मला पाठविली. त्याद्वारे शासनाचे अंदाजे ५ हजार ते ८ हजार कोटी रुपयांचा कर चुकवून फसवणूक केल्याचे आढळून आले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रुणाल मुल्ला तपास करीत आहेत.