Maval Assembly Election 2024 | ‘सांगली पॅटर्न’ नंतर आता ‘मावळ पॅटर्न’; सुनील शेळकेंच्या पराभवासाठी नवी रणनीती; शरद पवारांचा पक्ष उमेदवार देणार नाही तर…

मावळ : Maval Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यात दोन पक्षात झालेल्या बंडानंतर राजकीय समीकरणे बदललेली आहेत. त्यामुळे त्याचा परिणाम या विधानसभा निवडणुकीत दिसत आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) गाजलेल्या ‘सांगली पॅटर्न’नंतर आता विधानसभा निवडणुकीत ‘मावळ पॅटर्न’ उदयास आला आहे.
राष्ट्रवादी अजित पवारांचे उमेदवार (Ajit Pawar NCP) सुनील शेळकेंना (Sunil Shelke) घेरण्यासाठी मावळमध्ये हा पॅटर्न राबवला जाणार आहे. त्यासाठी शरद पवार (Sharad Pawar) इथं उमेदवार देणार नसून, बंडखोर बापू भेगडेंना (Bapu Bhegade) मविआचा पाठिंबा जाहीर करणार आहेत, अशी माहिती आहे. बापू भेगडेंना मावळ भाजपने (BJP) आधीचं पाठिंबा जाहीर केला आहे, अशातच आता सुनील शेळकेंच्या पराभवासाठी शरद पवार सुद्धा नवा डाव टाकणार आहेत.
महाविकास आघाडीच्या जागावाटपात मावळ मतदारसंघ राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वाट्याला येणार आहे. म्हणूनच बंडखोर बापू भेगडेंनी शरद पवारांकडे पाठिंबा देण्याची मागणी केलेली आहे. शरद पवारांकडून सुद्धा या मागणीला संमती मिळणार असे जवळपास निश्चित मानले जात आहे. म्हणूनच शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील काही नेते भेगडेंच्या प्रचारात सक्रिय होताना दिसू लागले आहेत.
सोबतच काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना ही भेगडेंना पाठिंबा देत शेळकेंना कोंडीत पकडणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळं राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार सुनील शेळके विरोधात अवलंबला जाणारा हा मावळ पॅटर्न सध्या चांगलाच चर्चेत आहे.