Maval Pune Crime News | खेड शिवापूर नंतर आता मावळात पावणे अठरा लाख जप्त; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी पथकांकडून वाहनांची तपासणी

पुणे : Maval Pune Crime News | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू झाल्याने मावळ विधानसभा मतदारसंघात विविध ठिकाणी पथकांकडून वाहनांची तपासणी केली जात आहे. मावळ येथील शिरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत उर्से टोल नाका परिसरात स्थिर सर्वेक्षण पथकाने सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास कारमधून १७ लाख ७५ हजारांची रोकड जप्त केली.

कार चालक पियुष जखोडीया (वय ३४) यांना ताब्यात घेतले आहे. मावळ येथील शिरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत उर्से टोलनाका येथे खोपोलीकडून पुण्याकडे जात असलेल्या कारची तपासणी केली. त्यावेळी कारमध्ये रोकड सापडली.

कारचालकाकडे चौकशी केली असता त्यांचा कापड व्यवसाय असून ते पुण्यात दिवाळी करता खरेदीस जात असल्याचे सांगितले. मात्र, तपासात तफावत आढळल्याने रक्कम जप्त करण्यात आली. जप्त करण्यात आलेली रक्कम आयकर विभागाकडे हस्तांतरित केली आहे.

काही दिवसापूर्वी खेड शिवापूर टोल नाक्यावर खासगी गाडीतून मोठ्या प्रमाणात रोकड जप्त केली होती. सुरुवातीला ही रक्कम १५ कोटी असल्याचे जाहीर केले. नंतर ५ कोटी असल्याचे सांगण्यात आले.