Gultekdi Pune Crime News | पुणे: खटल्यात साक्षीदार असल्याने सराईत गुन्हेगाराने डोक्यात फळी मारुन केले जखमी; गुलटेकडी येथील मिनाताई ठाकरे वसाहतीतील घटना

पुणे : Gultekdi Pune Crime News | शिवाजीनगर येथील कौटुंबिक न्यायालयासमोर (Shivaji Nagar Family Court) तरुणावर कोयत्याने वार (Koyta Attack) करुन गंभीर जखमी केल्याच्या खटल्यातील साक्षीदाराच्या डोक्यात सराईत गुन्हेगाराने प्लायवूडची फळी मारुन गंभीर जखमी केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत अभिजित राजू मिरगणे (वय २४, रा. मिनाताई ठाकरे वसाहत, गुलटेकडी) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात (Swargate Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी ओंकार दयानंद पवार (वय २५, रा. अप्पर डेपो, शेवटचा बसस्टॉप) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार गुलटेकडी येथील मिनाताई ठाकरे वसाहतीतील (Meenatai Thackeray Vasahat) गल्ली क्रमांक १ मध्ये मंगळवारी रात्री साडेदहा वाजता घडला. (Attempt To Kill)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर येथील कौटुंबिक न्यायालयाच्या गेटसमोर हर्षद अप्पा ढेरे (रा. अण्णासाहेब साठेनगर) या तरुणाच्या डोक्यात तिघांनी कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केले होते. त्यात ओंकार दयानंद पवार, अन्वर शाहीर शेख ऊर्फ झंब्या यांना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली होती. या खटल्यात फिर्यादी साक्षीदार आहेत.
फिर्यादी हे महापालिकेत सफाई कर्मचारी म्हणून काम करतात. त्यांनी नेहमीप्रमाणे रात्री आपली दुचाकी व्हेईकल डेपो येथे पार्क करुन ते घरी पायी जात होते. त्यावेळी पाठीमागून सराईत गुंड ओंकार पवार हा आला. त्याने फिर्यादीच्या पायात पाय अडकवून त्यांना खाली पाडले. फिर्यादी यांनी जाब विचारल्यावर त्याने शिवीगाळ केली. तू माझ्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यांतील साक्षीदार आहेस ना, असे विचारले. त्यावर फिर्यादी यांनी तुला कोणी सांगितले?, असे विचारले. त्यावर त्याने मी चार्जशीट पाहिले आहे, असे बोलून त्याने तिथे पडलेली प्लायवूडची फळी डोक्यात मारुन जखमी करुन तो पळून गेला. फिर्यादी यांनी ससून रुग्णालयातून उपचार घेतल्यानंतर फिर्याद दिली असून पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करीत आहेत.