Rahul Dambale | मविआने धर्मनिरपेक्ष मतदारांचा अपेक्षा भंग करू नये ! भाजपातील आयारामांना उमेदवारी नको – राहुल डंबाळे

Rahul Dambale

पुणे : Rahul Dambale | विधानसभा निवडणुकांमध्ये (Maharashtra Assembly Election 2024) महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) भारतीय जनता पक्ष (BJP) व त्यांच्या सहयोगी पक्षांतर्फे लोकसभेत काम केलेल्या आयारामांना विधानसभेत उमेदवारी देऊ नये. अशा प्रकारचे कृत्य हे धर्मनिरपेक्ष व अल्पसंख्यांक मतदारांची फसवणूक ठरेल असे मत रिपब्लिकन युवा मोर्चाचे (Republican Yuva Morcha) नेते राहुल डंबाळे यांनी पत्राद्वारे मविआ नेत्यांकडे व्यक्त केले आहे.

लोकसभा निवडणुकीमध्ये संविधान वाचवणे तसेच धार्मिक ध्रुवीकरण रोखण्यासाठी धर्मनिरपेक्ष व अल्पसंख्यांक समुदायाने एकजुटीने आपले अंतर्गत सर्व मतभेद बाजूला ठेवून महाविकास आघाडीच्या पाठीशी ठामपणे उभा राहिलेला आहे , याचा सकारात्मक परिणाम म्हणून देशातील सर्वाधिक यश हे महाराष्ट्रातून इंडिया अलायन्सला मिळालेले आहे. असे असताना या वातावरणाचा गैरफायदा उठवण्याच्या इराद्याने तसेच आपला पराभव निश्चित असल्याची जाणीव झाल्याने अनेक भारतीय जनता पक्ष व मित्र पक्षातील संभाव्य उमेदवार हे मविआकडे उमेदवारी मिळावी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस , काँग्रेस व शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत.

मागील महिन्याभरातील घडामोडी पाहता भाजपशी संबंधित नेत्यांना मविआतर्फे उमेदवारी देण्याचे संकेत मिळत आहेत. अल्पसंख्यांक व धर्मनिरपेक्ष मतदारांमध्ये यामुळे मोठी नाराजी पसरली असून मविआकडून आपली फसवणूक होत आहे अशी धारणा त्यांच्या मनात आहे. इंडिया आलायन्स व मविआला मतदान करणाऱ्या अल्पसंख्यांक व धर्मनिरपेक्ष गटांना उमेदवारी न देता अन्य भाजपायी आयात उमेदवारांना उमेदवारी दिल्याने याचा गंभीर फटका विधानसभा निवडणुकीत बसू शकतो व महायुतीला याचा थेट फायदा पोहोचण्याची शक्यता आहे व याला सर्वस्वी जबाबदार हे मविआचे नेतृत्वच राहणार आहे. अशी टिकाही डंबाळे यांनी केली.

भाजपा कडून आयात उमेदवारांना उमेदवारी देणे टाळून त्याच जागेवर अल्पसंख्यांक व धर्मनिरपेक्ष चळवळीतील चांगल्या कार्यकर्त्यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी रिपब्लिकन युवा मोर्चाचे नेते राहुल डंबाळे यांनी केली आहे.

सदर बाबतचे पत्र त्यांनी मविआ नेते शरद पवार (Sharad Pawar), उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) व राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याकडे पाठवलेले आहे.