Pune ACB Trap News | 5 लाख रुपयांची लाचेची मागणी करुन 2 लाखांची लाच घेताना महावितरणचा कार्यकारी अभियंता जाळ्यात

पुणे : Pune ACB Trap News | प्रलंबित असलेल्या ५ फाईलवर कार्यवाही करण्यासाठी तसेच मांजरी येथील नवीन इमारतीसाठी उभारलेल्या डीपीवर वीज भार मंजूर केल्याचा मोबदला म्हणून ५ लाख रुपयांची लाचेची मागणी करुन त्यापैकी २ लाख रुपये स्वीकारताना महावितरणचे कार्यकारी अभियंता याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले. (Pune Bribe Case)
भाऊसाहेब मच्छिंद्र सावंत Bhausaheb Machindra Sawant (वय ५१) असे या कार्यकारी अभियंताचे नाव आहे. याबाबत एका विद्युत ठेकेदाराने तक्रार केली होती़ त्यांनी त्यांच्या ओळखीचे व्यावसायिकांच्या ५ नवीन इमारतीसाठी इलेक्ट्रिक डी पी उभारुन सप्लाय चालू करुन देण्याचे काम घेतले होते. त्यासाठी त्यांनी ५ फाईल तयार करुन मंजुरीसाठी कार्यकारी अभियंता भाऊसाहेब सावंत यांच्या बंडगार्डन येथील महावितरण कार्यालयात दिलेल्या होत्या. तसेच तक्रारदार यांनी मांजरी येथील एका नवीन इमारतीच्या ठिकाणी उभारलेल्या डी पीवर भाऊसाहेब सावंत याच्याकडून वीज भार मंजूर करुन घेऊन सप्लाय चालू करुन दिला आहे.
सावंत याच्याकडे तक्रारदार यांच्या वरील प्रलंबित असलेल्या ५ फाईलवर कार्यवाही करण्यासाठी आणि तक्रारदार यांनी मांजरी येथील नवीन इमारतीसाठी उभारलेलया डीपीवर वीज भार मंजूर केल्याचा मोबदला म्हणून सावंत याने तक्रारदार यांच्याकडे ५ लाख रुपयांची मागणी केली.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारदार यांच्या तक्रारीची ७, ८, २१ व २२ ऑक्टोंबर रोजी पडताळणी केली. त्यात तक्रारदार यांची कामे करण्यासाठी मोबदला म्हणून ५ लाख रुपयांची लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. तक्रारदाराकडे मागितलेल्या ५ लाख रुपयांच्या लाचेपैकी अॅडव्हान्स म्हणून २ लाख रुपये लाच घेण्याचे सावंत याने कबुल केले. त्यानुसार महावितरणच्या बंडगार्डन कार्यालयात सापळा रचला. तक्रारदाराकडून २ लाख रुपये स्वीकारताना सावंत याला रंगेहाथ पकडण्यात आले. वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत असून भाऊसाहेब सावंत याला अटक करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे (Shirish Sardeshpande), अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे (Sheetal Janve) यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून पोलीस निरीक्षक विरनाथ माने तपास करीत आहेत.