Porsche Accident Pune Update | पोर्शे कार अपघात प्रकरणात रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

पुणे : Porsche Accident Pune Update | कल्याणीनगर पोर्शे कार अपघात (Kalyani Nagar Porsche Accident) प्रकरणात कारमध्ये मागे बसलेल्या एका अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात (Blood Sample Tampering Case) एका आरोपीचा अटकपूर्व जामीन उच्च न्यायालयाने (Bombay High Court) फेटाळला आहे. या आरोपीच्या सांगण्यावर एकाने स्वतःच्या रक्ताचे नमुने दिले होते.
अरुणकुमार सिंग असे जामीन फेटाळण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर सिंग याने येथील जिल्हा न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र न्यायालयाने तो फेटाळला होता. त्यामुळे त्याने उच्च न्यायालयात अपील केले होते. सुरुवातीला त्याला अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला होता.
मात्र आता न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज आज (दि.२३) फेटाळून लावला. जामीन फेटाळल्याने त्याला अटक करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने आवश्यक असलेली कारवाई पोलिसांनी करावी, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी सिंगच्या जामिनास विरोध केला. गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी त्याची पोलिस कोठडीत चौकशी करणे गरजेचे आहे, असा युक्तिवाद त्यांनी केला. आरोपींच्या वतीने ज्येष्ठ वकील आबाद पोंडा आणि ऍड. आबिद मुलाणी यांनी बाजू मांडली.
मोटारचालक मुलाच्या दोन अल्पवयीन मित्रांना वाचविण्यासाठी या गुन्ह्यात अटक करण्यात आलेला आरोपी आदित्य सूद व आशिष मित्तल यांनी ससूनच्या आपत्कालीन विभागाचे तत्कालीन मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हळनोर व न्यायवैद्यक विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे यांना लाच दिली होती.
त्यानंतर आदित्य सूदने एका मुलाच्या रक्ताच्या नमुन्यांच्या जागी स्वतःच्या रक्ताचा नमुना दिला, तर आशिष मित्तलने आरोपी अरुणकुमार सिंग याच्या सांगण्यावरून दुसऱ्या मुलाच्या जागी स्वतःचे रक्त दिल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे.
त्यानंतर सूद आणि मित्तल अटकेच्या भीतीने परराज्यात पळून गेले होते. पुणे पोलिसांची पथके मागावर असल्याचे कळताच ते पुण्यात परतले. त्यावेळी पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यानंतर दोन्ही आरोपींनी जामिनासाठी अर्ज केला होता. दरम्यान न्यायालयाने जामीन फेटाळला होता.