Eknath Shinde-Amit Shah | एकनाथ शिंदेंनी थेट अमित शहांचा सल्ला धुडकावला

मुंबई : Eknath Shinde-Amit Shah | विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी दिलेला सल्ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी धुडकावल्याचे दिसत आहे. उमेदवारांच्या पहिल्या यादीतून ही बाब स्पष्टपणे समोर आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची काही दिवसांपूर्वी दिल्लीत भेट झाली. त्यावेळी राज्यात आचारसंहिता लागू झालेली नव्हती. (Mahayuti News)
राज्यात भाजपविरोधात वातावरण आहे. भाजपने अधिक जागा लढवल्यास लोकसभेसारखा फटका बसेल. त्याचा परिणाम महायुतीच्या कामगिरीवर होईल. त्यामुळे महायुतीची सत्ता पुन्हा आणायची असल्यास शिवसेनेला १२० जागा लढवू द्या, अशी मागणी शिंदेंनी शहांकडे केली होती. त्यांनी १२० जागांची यादीही शहांना देण्यात आली होती. (Shivsena Shinde Group)
या भेटीत शहांनी शिंदेंना तिकीट वाटप करताना नवे चेहरे देण्याचा सल्ला दिला. शिवसेनेच्या बहुतांश आमदारांविरोधात नाराजी आहे. त्यामुळे नव्या चेहऱ्यांना संधी द्या. अन्यथा त्या जागांवर पराभव पत्करावा लागेल. त्याचा परिणाम महायुतीच्या एकत्रित कामगिरीवर होईल, असं शहांनी शिंदेंना सांगितले होते. मात्र हा सल्ला शिंदेंना पटलेला दिसत नाही.
विद्यमान आमदारांचे तिकीट कापल्यास विधानसभेच्या तोंडावर चुकीचा मेसेज जाईल. बंडात साथ देणाऱ्या आमदारांना शिंदेंनी वाऱ्यावर सोडलं, असा संदेश पसरेल. त्याचा फटका बसेल, अशी शक्यता होती. त्यामुळे शिंदेंनी थेट शहांचा सल्ला धुडकावला आणि विद्यमान आमदारांना पुन्हा संधी दिल्याचे पाहायला मिळत आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरही भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वाने शिंदेंना नवे चेहरे देण्याची सूचना केली होती. पण शिंदेसेनेच्या उमेदवारांची पहिली यादी पाहता त्यांना भाजप नेतृत्त्वाच्या सुचना पटलेल्या दिसत नाहीत.