Beed Assembly Election 2024 | बीड मतदारसंघात मराठा आणि ओबीसींची मोट बांधण्याची शरद पवारांची खेळी; संदीप क्षीरसागर की ज्योती मेटेंच्या हाती तुतारी? राजकीय वर्तुळात उत्सुकता

बीड : Beed Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच पक्षांनी रणनीती आखत मोर्चेबांधणी सुरु केलेली आहे. लोकसभेला आपला करिष्मा दाखवल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीने (Sharad Pawar NCP) कंबर कसली आहे. दरम्यान एकाच मतदारसंघातून अनेकजण तुतारी (Tutari) चिन्हावर लढण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे असा तिढा असणाऱ्या मतदारसंघात शरद पवारांची भूमिका महत्वाची ठरणार आहे.
लोकसभा निवडणुकीपासून गोपीनाथ मुंडेंच्या (Gopinath Munde) बीडमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा बोलबाला आहे. बीडच्या राजकारणात शरद पवार आणि जरांगे फॅक्टर (Jarange Factor) अतिशय महत्वाचा ठरु लागला आहे. त्यामुळंच बीड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार पक्ष कोण उमेदवार देतोय याकडं मराठवाड्याचं लक्ष लागलं आहे.
तर दुसरीकडे धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि पंकजा मुंडे (Pankaja Munde) हे बहिण भाऊ एकत्र आल्याने त्यांच्या प्रस्थापित राजकारणाला आणखीनच बळकट हात मिळाले आहेत. त्यामुळे आता शरद पवार कोणाला मैदानात उतरवणार हे निर्णायक असणार आहे.
बीड विधानसभा मतदारसंघात संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) यांना उमेदवारी मिळणार असल्याची दाट शक्यता आहे. पण त्यापूर्वीच ज्योती मेटे (Jyoti Mete) यांना राष्ट्रवादीत प्रवेश देण्यात आला आहे. लोकसभेवेळी उमेदवारी हुकली पण यावेळी उमेदवारी नक्की असल्याचे ज्योती मेटेंनी सांगितलं आहे.
त्यामुळं शरद पवार संदीप क्षीरसागरांऐवजी दुसरा उमेदवार देतात की ज्योती मेटे यांना घेऊन मराठा-कुणबी (Maratha Kunbi) समीकरण पक्क करतात याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.
शरद पवारांनी बीडमध्ये बेरजेचं राजकारण करत पक्षप्रवेश करवून घेतले. पण पवार उमेदवारीची तुतारी कुणाच्या हाती देणार याची उत्सुकता आहे. ज्योती मेटेंना सोबत घेऊन बीड विधानसभेत मराठा आणि ओबीसींची मोट बांधण्याची शरद पवारांची खेळी असावी असे तर्कवितर्क काढले जात आहेत.
संदीप क्षीरसागरांना विधानसभा तर विधानपरिषदेवर ज्योती मेटेंची वर्णी लावण्याचा पवारांचा हेतू असावा. भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के (Rajendra Mhaske Beed) यांच्या पक्षप्रवेशाचंही तेच गणित असावं, अशीही मतदारसंघात कुजबुज आहे.