Khadakwasla Assembly Constituency | खडकवासला विधानसभा मतदारसंघात महायुतीची डोकेदुखी वाढणार?; राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्याकडून मैदानात उतरण्याची तयारी, पोस्टर होतय Viral

Dattatray Dhankawade

पुणे : Khadakwasla Assembly Constituency | शहरातील विधानसभा मतदारसंघांमध्ये उमेदवारीवरून भाजपमध्ये गोंधळ सुरू असताना उपमुख्यमंत्री अजित पवार समर्थक नेत्याने खडकवासला विधानसभा मतदारसंघात दावा ठोकला असल्याने महायुतीची (Mahayuti) डोकेदुखी वाढणार आहे. ‘आमचं ठरलंय खडकवासला विधानसभा’ म्हणत दत्तात्रय धनकवडे (Dattatray Dhankawade) यांचे पोस्टर्स सध्या व्हायरल होत आहेत. विकासाच्या कामावर दत्तात्रय धनकवडे यांना ओळखले जाते.

पुण्याचे माजी महापौर असणारे दत्तात्रय धनकवडे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात आहेत. त्यांनी खडकवासला विधानसभा मतदारसंघात इच्छुक असल्याचे म्हणत महायुतीचे टेन्शन वाढवले आहे. खडकवासल्यात भाजपचे विद्यमान आमदार असताना राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या (Ajit Pawar NCP) नेत्याने या जागेवर दावा केल्याने हा मतदारसंघ चर्चेचा विषय ठरत आहे.

एकाच मतदारसंघात भाजपचे एकापेक्षा अधिक इच्छुक असताना त्यात महायुतीतील मित्रपक्षातील नेत्याने दावा केल्याने जागावाटपाचा तिढा कसा सोडवायचा असा प्रश्न महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये आहे.

खडकवासला विधानसभा मतदारसंघात उमेदवारीवरून भाजपमध्ये रस्सीखेच सुरू असून विद्यमान आमदार भीमराव तापकीर यांच्या विरोधात भाजपमधील इच्छुक एकवटले असताना आता अजित पवार गटाच्या नेत्यांकडून मैदानात उतरण्याची तयारी सुरु आहे.

या मतदारसंघात २०१९ मध्ये भाजपाला निसटता विजय मिळाला होता. त्यानंतर ५ वर्षात भीमराव तापकीर (Bhimrao Tapkir) यांना प्रभाव पाडता आला नाही अशी चर्चा आहे.