Deepak Mankar News | राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष दीपक मानकर अधिक जोमाने पक्षाचा प्रचार करणार; अजित दादांनी शब्द दिलाय म्हणत राजीनामा मागे

Deepak-Mankar-Ajit-Pawar

पुणे : Deepak Mankar News | राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे (Ajit Pawar NCP) शहराध्यक्ष दीपक मानकर यांना विधानपरिषदेवर संधी न दिल्याने अनेक पदाधिकारी नाराज आहेत. दरम्यान पक्षाच्या विविध पदावरून जवळपास ८०० हुन अधिक पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला होता.

“हजारो कार्यक्रम घेऊन पक्षाला सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवले. असे असताना, पक्षाने संधी न दिल्याची सल कार्यकर्त्यांच्या मनात आहे. पक्षाने मला ताकद दिली, तर कार्यकर्त्यांना ताकद मिळणार आहे, याचा पक्षाला विसर पडत आहे”, अशी प्रतिक्रिया दीपक मानकर यांनी दिली होती.

दरम्यान आज (दि.१८) शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्यानंतर अचानक मानकर यांनी राजीनामा देणार नसल्याचे सांगितले. पवार यांनी पाठीशी उभे राहण्याचा शब्द दिला आहे, त्यामुळे लवकरच विधानसभा निवडणूक नियोजनासाठी शहर पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मानकर यांच्या समर्थनासाठी पक्षाच्या शहरातील पदाधिकाऱ्यांनीही राजीनामे जाहीर केले होते. कोणाचाही राजीनामा मंजूर करणार नाही असे अजित पवार यांनी सांगितले असल्याची माहिती मानकर यांनी दिली. आगामी काळात तुम्हाला नक्की न्याय दिला जाईल असा शब्द उपमुख्यमंत्री पवार यांनी दिला. त्यामुळे राजीनामा देणार नाही, उलट पक्षाचे काम पूर्ववत अधिक जोमाने करणार असल्याचे मानकर यांनी म्हंटले आहे.