Congress Leader Mohan Joshi | रेल्वे बुकिंग कालावधी कमी करण्याचा मोदी सरकारचा निर्णय एजंटसाठी की जनतेसाठी? – माजी आमदार मोहन जोशी

पुणे – Congress Leader Mohan Joshi | रेल्वे तिकीट आरक्षणाचा (बुकिंग) कालावधी १२० दिवसांवरून ६० दिवसांवर आणण्याचा मोदी सरकारचा निर्णय सामान्य जनतेच्या सोयीचा नसून एजंटांच्या फायद्याचा आणि सरकारच्या नफेखोरीसाठी घेतलेला आहे, असा आरोप प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी यांनी केला आहे.

रेल्वे प्रवासाचे तिकीट बुकिंग १२० दिवस अगोदर करण्याची मुभा होती. तीर्थयात्रा, सहली, मंगलकार्य अशासाठी सामान्य प्रवासी १२० दिवस आधीच बुकिंग करून ठेवत असे. याचा फायदा त्यांना सवलत मिळविण्यासाठी आणि दीर्घ प्रवासाचे नियोजन करण्यासाठी होत असे. ही सवय लोकांच्या अंगवळणी पडली होती. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी अचानकपणे बुकिंग चा कालावधी १२० दिवसांवरून ६० दिवसांवर आणला. मध्यमवर्गीय प्रवासी यामुळे नाराज झाले आहेत. कालावधी कमी केल्याने सरकारला सवलती द्याव्या लागणार नाहीत, मोदी सरकारची नफेखोरी चालू रहाणार आहे आणि एजंटांचे फावणार आहे, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या या निर्णयाचा निषेध करतो. रेल्वे खात्याचा कारभार सामान्य माणसासाठी सोयीचा न रहाता वैष्णव यांच्या काळात अव्यवहार्य आणि मनमानी राहिलेला आहे, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

ज्येष्ठ नागरिकांची सवलत चालू ठेवा

वयाची साठी उलटलेल्या ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे तिकीटात सवलत दिली जात होती. करोना साथीचे निमित्त करून मोदी सरकारने ती सवलत रद्द केली. ती सवलत अद्यापपर्यंत पुन्हा सुरू झालेली नाही. अनेक वर्ष ज्येष्ठ नागरिकांसाठी मिळत असलेली ही सवलत पुन्हा चालू करावी, अशी मागणी मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.