Shivsena Shinde Group On Amit Shah | शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचे अमित शहांना प्रत्युत्तर; म्हणाले – ‘आमदारक्या पणाला लावून गुवाहाटीला गेलो, म्हणून भाजपची सत्ता’

मुंबई : Shivsena Shinde Group On Amit Shah | आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर भाजप नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री पदावरून एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) उद्देशून भाष्य केले. त्यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहेत. “एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पद देताना आमच्या नेत्यांना त्याग करावा लागला, त्यामुळे आता जागा वाटपात झुकते माप घ्यावे”, असे विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री शिंदेंना उद्देशून केले होते.
दरम्यान अमित शहा यांच्या या वक्तव्याला शिवसेना शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील (Shahaji Bapu Patil) यांनी जोरदार प्रत्यूत्तर दिले आहे. आम्ही आमदारक्या पणाला लावून गुवाहाटीला गेलो, म्हणून भाजपची सत्ता आली, असे शहाजी बापू पाटील यांनी पंढरपूरमध्ये माध्यमांशी बोलताना सांगितले.
शहाजी पाटील म्हणाले, ” भाजपने एकनाथ शिंदे यांच्यासाठी त्याग केला, हे खरे आहे. पण आम्ही धाडस केले. आमच्या आमदारक्या पणाला लावून गुवाहाटीला गेलो. म्हणून भाजपा सत्तेत आले. आम्ही धाडस केले नसते तर भाजपच्या त्यागाचे काय महत्व होते?”, असा सवाल शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील यांनी उपस्थित केला आहे.