Retired IPS Makrand Ranade | सेवानिवृत्त IPS अधिकारी मकरंद रानडे यांनी राज्य माहिती आयुक्त म्हणून पुणे खंडपीठाचा पदभार स्विकारला

Retired IPS Makrand Ranade

पुणे : Retired IPS Makrand Ranade पुणे, मुंबई सह अनेक शहरात अतिशय शिस्तबद्ध पोलीस अधिकारी म्हणून नावलौकिक मिळविणारे सेवानिवृत्त पोलीस अधिकारी मकरंद रानडे यांनी आज राज्य माहिती आयुक्त म्हणून पुणे खंडपीठाचा पदभार स्वीकारला आहे.

विशेष पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे हे मार्च महिन्यात पोलीस सेवेत निवृत्त झाले होते. त्यानंतर लगेच त्यांची राज्य माहिती आयुक्तपदी निवड करण्यात आली होती. त्यांच्याकडे छत्रपती संभाजीनगर येथील राज्य माहिती आयुक्त म्हणून कार्यभार देण्यात आला होता. पुण्यातील माहिती आयुक्त निवृत्त झाल्याने हे पद रिक्त झाले होते. तेथे मकरंद रानडे यांची नेमणूक करण्यात आली आहे.

याबाबत मकरंद रानडे यांनी सांगितले की, आपण पुण्यात स्थायिक असल्याने पुण्यात पद मिळावे, अशी विनंती केली होती. येथील पद रिक्त झाल्यानंतर ही विनंती मान्य करुन राज्य माहिती आयुक्त पदाच्या पुणे खंडपीठावर आपली नियुक्ती करण्यात आली. तसेच छत्रपती संभाजीनगर येथील खंडपीठाचा अतिरिक्त पदभार ही सध्या आपल्याकडे आहे.

माहिती अधिकाराबाबत अपिले मोठ्या प्रमाणावर प्रलंबित आहेत. त्याचा लवकरात लवकर निपटारा करुन लोकांना न्याय मिळवून देण्याचा आपला प्रयत्न राहिल, असे मकरंद रानडे यांनी सांगितले. अतिशय शिस्तबद्ध पोलीस अधिकारी म्हणून मकरंद रानडे यांना ओळखले जाते. त्यांनी सहायक पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त म्हणून पुणे शहर पोलीस दलात काम केले आहे. तसेच पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पहिले अपर पोलीस आयुक्त म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. पिंपरीमध्ये असताना त्यांची २०१९ मध्ये अमरावती परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती.