Pune ACB Trap Case | शिक्षण हक्क प्रवेशाचे पैशांचा आदेश काढण्यासाठी 1 टक्का लाच मागणारी मुख्य लिपिक जाळ्यात

ACB Trap News

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही पैसे मिळविण्यासाठी द्यावी लागते लाच

पुणे : Pune ACB Trap Case | शिक्षण हक्क प्रवेशाबाबत शासनाने अदा केलेले पैसे देण्यासाठी नाशिकच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांना आदेश काढण्यासाठी मिळणार्‍या पैशांच्या एक टक्का रक्कमेची लाच मागणार्‍या मुख्य लिपिक महिलेला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. सेंट्रल बिल्डिंगमधील प्राथमिक शिक्षण संचालनालयात आज ही कारवाई करण्यात आली. (Pune Bribe Case)

मुख्य लिपिक सुनिता रामकृष्ण माने Sunita Ramkrishna Mane (वय ४६) असे कारवाई केलेल्या महिलेचे नाव आहे. सुनिता माने या प्राथमिक शिक्षण संचालनालयात मुख्य लिपिक म्हणून कार्यरत आहेत. शासनाने आर टी ई अंतर्गत बालकांना मोफत शिक्षणाचा हक्क दिला असला तरी त्यासाठी शासनाकडून या प्रवेशापायी मिळणारी फि पदरात पाडून घेण्यासाठी अनेक अडथळे पार करावे लागतात. अगदी उच्च न्यायालयात जाऊन आदेश मिळविल्यानंतरही लाच द्यावी लागत असल्याचे या कारवाईने दिसून येत आहे.

तक्रारदार यांच्या कायम विना अनुदानित प्रकारच्या दोन शाळा आहेत. त्यात इयत्ता पहिली ते बारावीचे शिक्षण दिले जाते. तक्रारदार यांच्या वरील दोन्ही शाळेत २०२३ -२४ या शैक्षणिक वर्षात आर टी ई अंतर्गत प्रवेशित असलेल्या बालकांना २५ टक्के प्रवेश देण्यात आलेला आहे. या प्रवेशाकरीता या बालकांच्या शिक्षणापोटी त्यांची फी ही शासनाकडून शाळांना देण्यात येते. त्यानुसार, २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात तक्रारदारांच्या दोन्ही शाळेत आर टी ई अंतर्गत २५ टक्के प्रवेश दिलेल्या बालकांची फी एकूण १२ लाख ६९ हजार १४१ रुपये तक्रारदारास शासनाकडून येणे बाकी होते. याबाबत उच्च न्यायालयाने (Bombay High Court) शासनास आठ आठवड्याच्या आतमध्ये ही रक्कम संबंधित संस्थाचालकास देण्याबाबत ऑगस्ट २०२४ मध्ये आदेश दिला होता. तयाप्रमाणे शासनाने सप्टेंबर २०२४ मध्ये रक्कमही रिलीज केली होती. ही रक्कम तक्रारदार यांना अदा करण्याबाबत शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जि. नाशिक यांना आदेश काढण्याकरीता मुख्य लिपिक सुनिता माने यांनी तक्रारदार यांच्याकडे त्यांना मिळणार्‍या रक्कमेच्या एक टक्के म्हणजे १२ हजार ६०० रुपये लाचेची मागणी केली. उच्च न्यायालयापर्यंत खेटे घालून, पुण्यात हेलपाटे मारायला लागून वर लाच द्यावी लागत असल्याने तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

या तक्रारीची पडताळणी बुधवारी करण्यात आली. त्यात सुनिता माने यांनी लाच मागितली असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सेंट्रल बिल्डिंगमधील प्राथमिक शिक्षण संचालनालय कार्यालयात सापळा लावला. तक्रारदार यांच्याकडून १२ हजार ६०० रुपये स्वीकारताना सुनिता माने यांना पकडण्यात आले. त्यांना ताब्यात घेण्यात आले असून बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे (Shirish Sardeshpande), अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे (Sheetal Janve) यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस उपअधीक्षक अनिल कटके (DySP Anil Katke) तपास करीत आहेत.