Maharashtra Assembly Election 2024 | महायुतीला शह देण्यासाठी हितेंद्र ठाकूर यांची नवी खेळी; महाविकास आघाडीला साथ देण्याबाबत हालचाली सुरु

Hitendra Thakur

वसई : Maharashtra Assembly Election 2024 | आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मागील १० वर्षांत अनेकदा अडचणीच्या काळात महायुतीला (Mahayuti) मदत करणाऱ्या बहुजन विकास आघाडीचे (Bahujan Vikas Aghadi) नेते हितेंद्र ठाकूर (Hitendra Thakur) यांनी भाजपला धडा शिकवण्याचा निर्धार केला असल्याची माहिती आहे. महाविकास आघाडीला साथ देण्याबाबत हालचाली सुरु असल्याची माहिती आहे.

गेल्या २५ वर्षांपासून वसई विरारच्या राजकारणात हितेंद्र ठाकूर यांची एकहाती सत्ता आहे. गेल्या १० वर्षांत हितेंद्र ठाकूर यांनी वेळोवेळी महायुतीला साथ दिली. मात्र, आता हितेंद्र ठाकूर हे महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) पाठिंबा मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत, अशी माहिती आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडी हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीला पाठिंबा देणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

हितेंद्र ठाकूर यांचे आतेभाऊ आणि बविआचे कार्याध्यक्ष राजीव पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु आहे. राजीव पाटील यांचा भाजपा प्रवेश जवळपास निश्चित असून ते नालासोपाऱ्यातून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. हितेंद्र ठाकूर हे बहुजन विकास आघाडी पक्षाचे सर्वेसर्वा असले तरी राजीव पाटील हे पक्षात दोन नंबरचे नेते म्हणून ओळखले जातात.

राजीव पाटील यांनी गेल्या काही दिवसांपासून नवरात्रोत्सवात भाजप कार्यकर्त्यांच्या मंडळांना भेटी दिल्या होत्या. राजीव पाटील यांचा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत प्रवेश होण्याची शक्यता आहे.

याच कारणावरून भाजपा आणि पर्यायाने महायुतीला शह देण्यासाठी हितेंद्र ठाकूर यांनी नवी खेळी केली आहे. बविआला पाठिंबा दिल्यास हितेंद्र ठाकूर मविआचे तीन उमदेवार निवडून आणू शकतात, अशी चर्चाही सुरू आहे.