Igatpuri Assembly Constituency | काँग्रेसच्या आमदाराने साथ सोडल्यानंतर त्याच मतदारसंघातील जुना शिलेदार घरवापसीच्या तयारीत; राजकीय घडामोडींना वेग

Nirmala Gavit-Hiraman Khoskar

नाशिक : Igatpuri Assembly Constituency | काँग्रेस आमदार हिरामण खोसकरांनी (Hiraman Khoskar) अजित पवारांच्या राष्ट्रवादीत (Ajit Pawar NCP) प्रवेश केल्यानंतर निर्मला गावीत (Nirmala Gavit) यांना खोसकरांविरोधात उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. इगतपुरी विधानसभा मतदारसंघात २०१९ मध्ये काँग्रेसला सक्षम उमेदवार सापडत नव्हता. अखेरच्या क्षणी शरद पवार (Sharad Pawar) यांनी हिरामण खोसकर यांना राष्ट्रवादीतून काँग्रेसमध्ये पाठविले. लगोलग त्यांना उमेदवारी मिळून ते विजयीही झाले.

आमदार बनलेल्या खोसकरांचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंसह (Nana Patole) अनेकांशी जमले नाही. विधान परिषद निवडणुकीत मतांच्या फाटाफुटीमुळे खोसकर संशयाच्या भोवऱ्यात सापडले होते. विधानसभा निवडणुकीत त्यांचे पक्षांतर अटळ होते. स्वगृही परतताना त्यांनी मात्र ज्या शरद पवारांमुळे ते आमदार झाले, त्यांच्याऐवजी राष्ट्रवादी अजित पवार गटाची निवड केली.

निर्मला गावित यांनी २०१९ मध्ये काँग्रेस पक्षाला रामराम करत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला होता. दरम्यान महाविकास आघाडीत हा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाला सुटावा असा आग्रह आहे. मात्र काँग्रेस जागा सोडत नसल्याने निर्मला गावीत काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. दोन्ही पक्ष महाविकास आघाडीचे घटक पक्ष असल्याने पक्ष प्रवेशाला अडचण असणार नाही, असे बोलले जात आहे.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत हिरामण खोसकर यांनी निर्मला गावीत यांचा पराभव केल्यानंतर पुन्हा हे दोघे प्रतिस्पर्धी एकमेकांच्या समोर येण्याची शक्यता आहे.