CBI File FIR On Bhagyashree Navtake | आयपीएस अधिकारी भाग्यश्री नवटाके यांच्यावर सीबीआयने नव्याने केला एफआयआर

Bhagyashree Navtake

पुणे : CBI File FIR On Bhagyashree Navtake | जळगाव येथील भाईचंद हिराचंद रायसोनी (BHR Scam Case) पतसंस्थेतील गैरव्यवहार प्रकरणाच्या तपासात अनियमितता असल्याच्या आरोपावरुन आयपीएस अधिकारी भाग्यश्री नवटाके यांच्याविरुद्ध सीबीआयने नव्याने गुन्हा दाखल केला आहे. पुणे शहर पोलीस दलात (Pune City Police) आर्थिक गुन्हे शाखेच्या (DCP EoW Pune) पोलीस उपायुक्त म्हणून कार्यरत असताना भाग्यश्री नवटाके यांनी बीएचआर चे लिक्वीडेटर व इतरांनी मिळून पतसंस्थेच्या सभासदांची फसवणूक केल्याप्रकरणाचा तपास केला होता. महाविकास आघाडी सरकार असताना पुणे शहरातील डेक्कन पोलीस ठाणे, आळंदी व पिंपरी-चिंचवडमध्ये गुन्हे दाखल करुन त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे घेण्यात आला होता. पुण्यातून जळगावमध्ये जाऊन महिला पोलीस अधिकार्‍यांनी एकाच वेळी अनेक ठिकाणी छापे घातले होते. त्यामुळे जळगावमध्ये एकच खळबळ उडाली होती.

या गैरव्यवहार प्रकरणात संशयित आरोपी सुनील झंवर तसेच कुणाल शाह यांनी पोलीस महासंचालकांकडे दिलेल्या तक्रार अर्जावरुन गुन्हे शाखेकडून बीएचआर गैरव्यवहाराशी संबंधित तपासाची चौकशी करण्यात आली. सीआयडीने राज्याच्या गृहविभागाला याबाबत अहवाल सोपवला. या अहवालानुसार शासनाने पुणे पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. याबाबत गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार आर्थिक गुन्हे शाखेतील तत्कालीन पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटाके यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे (CBI) कडे सोपविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. फसवणूक आणि गुन्हेगारी कट रचल्याप्रकरणी सीबीआयने नवटाके यांच्याविरोधात नव्याने गुन्हा दाखल केला आहे. नवटाके यांनी १२०० कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणात तपास करणार्‍या पथकाचे नेतृत्व केले होते. यात त्यांनी उचित कारवाई केली नसल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे.

नवटाके यांनी प्रचलित कार्यपद्धतीकडे दुर्लक्ष करून घाईगडबडीने, तसेच कोणता तरी हेतू ठेवून गुन्हे दाखल केले, असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. आता सीबीआयने नवटाके यांच्याविरोधात पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे.