Pune BJP News | पुण्यात भाजपच्या माजी नगरसेवकांची व प्रमुख पदाधिकाऱ्यांची शहर कार्यालयात बैठक; गाफील राहू नका म्हणत केल्या सूचना

पुणे : Pune BJP News | विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) तारखा जाहीर झाल्या आहेत. २३ तारखेला गुलाल कोणाचा असणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहेत. दरम्यान भाजपने (दि.१५) नगरसेवकांची विभागनिहाय बैठक घेऊन गाफील राहू नका तसेच आपापल्या भागात जातीने लक्ष घालण्याच्या सूचना केल्या आहेत. तर मतदारसंघातील बुथवर व्यवस्थित काम होत आहे की नाही यावर प्रवासी कार्यकर्ते भेट देऊन त्याचा अहवाल सादर करणार आहेत.
भाजपने शहरातील आठही विधानसभा मतदारसंघातील माजी नगरसेवकांची व प्रमुख पदाधिकाऱ्यांची शहर कार्यालयात बैठक घेतली. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस सी. टी. रवी , पश्चिम महाराष्ट्र प्रभारी अजय जामवाल, माजी संघटन मंत्री रघुनाथ कुलकर्णी, शहराध्यक्ष धीरज घाटे (Dheeraj Ghate) आदी पदाधिकारी उपस्थित होते.
मतदारसंघनिहाय झालेल्या बैठकांमध्ये पक्षाच्या स्थानिक पातळीवर संघटनेचा, शक्ती केंद्र, बूथ प्रमुख आदी रचनेचा आढावा घेण्यात आला. पुढील ३० दिवसात करावयाची कामे प्रत्येकाला वाटून देण्यात आली आहेत.
महायुतीतील जागा वाटप (Mahayuti Seat Sharing Formula) व उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होण्यास आणखी काही दिवस लागणार आहेत. पण माजी नगरसेवकांनी उमेदवार घोषित होण्याची वाट न पाहता स्वतःची निवडणूक आहे असे समजून लगेच कामाला लागा.
प्रभागातील मतदारांशी संवाद साधा, केंद्र व राज्य सरकारच्या योजनांबद्दल जनजागृती करा, लाभार्थ्यांशी संवाद साधा अशा सूचना माजी नगरसेवकांना देण्यात आल्या आहेत. दरम्यान प्रत्येक विधानसभा मतदारसंघात प्रवासी कार्यकर्ते नियुक्त केले आहेत.
पुढचे दोन-तीन दिवस ते मतदारसंघात जाऊन शक्ती केंद्र, बूथला भेट देणार आहेत. कोणत्या ठिकाणी यंत्रणा आहे, कार्यकर्ते काम करत आहेत का नाही याची माहिती घेऊन त्याचा अहवाल सादर केला जाणार आहे. त्यामुळे निवडणुकीत बूथ रचना लावण्यात व काम करण्यास टाळाटाळ करणाऱ्यांची माहिती पक्षाच्या नेत्यांना मिळणार आहे. त्यातून पुढील सुधारणा केल्या जाणार आहेत.