Deepak Mankar News | अजित पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्याकडून पदाचा राजीनामा; म्हणाले – ‘आम्हाला विचारलंही जात नाही’ (Videos)

पुणे : Deepak Mankar News | राज्यपाल नियुक्त कोट्यातून महाराष्ट्र विधान परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तीन सदस्यांची नियुक्ती होणार होती. त्यापैकी एका जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (Ajit Pawar NCP) पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांची नियुक्ती व्हावी, अशी मागणी पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली होती. त्यामुळे शहर पदाधिकाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे.

त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामा दिला आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनीही आपण शनिवार पर्यंत पदाचा राजीनामा देत असल्याचे सांगत पक्षावर नाराजी व्यक्त केली आहे. राजीनामा दिला तरी एक कार्यकर्ता म्हणून मी अजित दादांसोबत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दीपक मानकर म्हणाले, ” २०१२ पासून मी राष्ट्रवादीचे काम करतोय. पुणे शहर अध्यक्षपदाची जबाबदारी मला दिली आहे. तेव्हा एक जागा पुणे शहराला देण्याची मागणी दादांना आम्ही केली होती. दादांनी याबाबत संपूर्ण जबाबदारी घेतली. दादांनी शब्द दिला की पाळण्याचे ते काम करतात. आणि ते एक जागा देणार होते.

पण परवा पंकज भुजबळ (Pankaj Bhujbal) आणि इद्रिस नायकवडी (Idris Naikwadi) यांचे नाव घेण्यात आले. जर पुणे शहराला एक जागा मिळाली असती तर कार्यकर्त्यांची ताकद वाढणार होती. मी मेरिट मध्ये कुठं कमी पडलो, तुम्ही दीपक मानकरला नाकारण्याचे कारण काय? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

शरद पवारांचा बालेकिल्ला याठिकाणी खूप चांगलं काम केलं होतं. दीपक मानकर जे काय करतो पैसे न घेता करतो. मला पुढं पुढं करायची सवय नाही हे दादांना माहीत होतं, माझी स्पष्ट भूमिका आहे. आता राजीनामा देत आहे. मी कार्यकर्ता म्हणून अजितदादांबरोबर राहणार आहे. दीपक मानकर तुम्हाला संधी देऊ शकत नाही, असं त्यांनी कमीत कमी विचारायला पाहिजे होतं”, असे म्हणत दीपक मानकर यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

विधानसभेच्या तोंडावर एकामागून एक अजित पवारांची साथ सोडताना दिसत आहेत. मागील काही महिने पिंपरी चिंचवडला शहराध्यक्ष मिळत नव्हता. आता तीच परिस्थिती पुणे शहरात उपस्थित होऊ शकते. विधानसभेला सामोरे जाताना शहराध्यक्ष म्हणजे सेनापतीच नसताना आम्ही कसे काय काम करायचे असा प्रश्नही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते विचारू शकतात.