Pune ACB News | स्व खर्चाने मुरुम टाकून रस्ता दुरुस्त करणार्‍यावर गुन्हा दाखल न करण्यासाठी लाच मागणार्‍या वनरक्षकावर गुन्हा दाखल

ACB Trap News

पुणे : Pune ACB News | वनविभागातून जाणारा पूर्वीपासून वापरत असलेला रस्ता अतिवृष्टीमुळे खराब झाला. स्व: खर्चातून मुरुम टाकून हा रस्ता दुरुस्त केला. त्यावर वन खात्याच्या जमिनीवर मुरुम का टाकला म्हणून गुन्हा दाखल करण्याची भिती दाखवून लाच मागणार्‍या वनरक्षकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने लाचेची मागणी केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. (Bribe Demand Case)

उल्हास दत्तात्रय मोरे Ulhas Dattatrey More (वय ३२, रा. भिगवण सर्कल कार्यालय, इंदापूर वनविभाग, ता. इंदापूर) असे या वनरक्षकाचे नाव आहे. याबाबत एका ३० वर्षाच्या रहिवाशाने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. तक्रारदार हे रहात असलेल्या घरासाठी वन विभागाच्या जागेतून पूर्वीपासून रस्ता वापरत होते. गेल्या काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे या रस्त्यावर खडे व चिखल झाला होता. त्यामुळे तक्रारदार यांनी स्वखर्चाने या रस्त्यावर मुरुम टाकून तो दुरुस्त केला.

वन रक्षक उल्हास मोरे याने वन खात्याच्या जमिनीवर मुरुम का टाकला, म्हणून गुन्हा दाखल करतो, असे सांगितले. तक्रारदार यांच्याकडे गुन्हा दाखल न करण्यासाठी १० हजार रुपयांची मागणी केली. तक्रारदार यांनी याची तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. तक्रारीची पडताळणी २३ ऑगस्ट रोजी केली असता उल्हास मोरे यांनी तक्रारदार यांच्याकडे ७ हजार रुपयांची मागणी करुन तडजोडीअंती ६ हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. तक्रारदार यांना भिगवण मधील भिगवण -सोलापूर रोडवरील हॉटेल भक्ती शक्ती येथे बोलावले. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. परंतु, उल्हास मोरे याला चाहुल लागल्याने तो तेथून पळून गेला. उल्हास मोरे याने लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले असल्याने त्याच्यावर लाचेची मागणी केल्याचा गुन्हा भिगवण पोलीस ठाण्यात (Bhigwan Police Station) दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे (Shirish Sardeshpande) , पोलीस उपअधीक्षक डॉ. शीतल जानवे (Sheetal Janve) यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली आहे़ पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे (Prasad Lonare) तपास करीत आहेत.