Maharashtra Assembly Election 2024 | भाजपची 50 उमेदवारांची पहिली यादी तयार; 288 पैकी 230 जागांवर महायुतीची चर्चा; 58 जागांवरील तिढा कायम

मुंबई : Maharashtra Assembly Election 2024 | लोकसभेला उमेदवार जाहीर करण्यात महायुतीला दिरंगाई झाल्याने त्याचा फटका बसला. त्यानंतर आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीने जागावाटप (Mahayuti Seat Sharing Formula) आणि उमेदवारी घोषित करण्याबाबत वेग वाढवल्याचे चित्र आहे. विधानसभेला २८८ पैकी १५० पेक्षा अधिक जागा लढण्याचे भाजपचे लक्ष्य आहे. त्यामुळे महायुतीत तणाव निर्माण झाला असल्याची माहिती आहे. अशातच भाजपने आपली पहिली यादी तयार केली आहे.

महायुतीच्या मुंबई आणि दिल्लीत बैठका सुरु आहेत. २८८ पैकी २३० जागांवर महायुतीची चर्चा झाली असून अद्याप ५८ जागांवरील तिढा कायम आहे. हा तिढा सुटताच भाजप ५० उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्याची शक्यता आहे.

भाजपाच्या मुख्यालयामध्ये अमित शहा यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र भाजप कोअर कमिटीची बैठक झाली. यामध्ये जागावाटप, रणनिती आणि लोकांनी दिलेला फिडबॅक यावर चर्चा झाली. निवडणूक जाहीर होताच भाजपा पहिली यादी जारी करणार आहे. कोअर कमिटीने ५० नावांवर शिक्कामोर्तब केले आहे.

भाजपा १५० ते १६० जागांवर निवडणूक लढणार आहे. २०१९ मध्ये १६२ जागांवर भाजपाने निवडणूक लढविली होती तर त्यापैकी १०५ जागांवर जिंकले होते. आता थोडी परिस्थिती बदललेली आहे. दोन महत्वाचे प्रादेशिक पक्ष फुटलेले आहेत. त्यात तिसरी आघाडी आलेली आहे. ही आघाडी कोणाची मते आपल्याकडे खेचते, मराठा आंदोलन, ओबीसी आंदोलन आदी गोष्टींचा या निवडणुकीवर प्रभाव असणार आहे.