Datta Sagre | दिपक मानकर यांना विधानपरिषदेवर संधी डावलल्याने शहर उपाध्यक्ष दत्ता सागरे राजीनामा देण्याच्या भूमिकेत

पुणे : Datta Sagre | आज महायुती सरकारने (Mahayuti Govt) राज्यपाल नियुक्त आमदारांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला. महायुतीकडून ७ जणांची राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून वर्णी लागली. यामध्ये चित्रा वाघ, विक्रांत पाटील, धर्मगुरु बाबुसिंग महाराज राठोड, पंकज छगन भुजबळ, इद्रिस नाईकवाडी, हेमंत पाटील, मनिषा कायंदे यांच्या नावांचा समावेश आहे.
दरम्यान या निवडीवरून राष्ट्रवादी अजित पवार गटात (Ajit Pawar NCP) नाराजीचा सुर आहे. पुणे शहराध्यक्ष दिपक मानकर (Deepak Mankar) यांना विधानपरिषदेवर संधी डावलल्याने शहर उपाध्यक्ष दत्ता सागरे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा देणार असल्याची भूमिका मांडली आहे.
दत्ता सागरे माध्यमांशी बोलताना म्हणाले,” आज अचानकपणे राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेची निवडणूक जाहीर करुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जे उमेदवार जाहीर केले त्यामध्ये पुणे शहराचे धडाडीचे नेतृत्व असणाऱ्या दिपक मानकर यांना संधी द्यायला पाहीजे होती. परंतु तसे न करता ज्यांच्या घरात सतत आमदार, खासदार, मंत्री पद आहेत अशांनाच पुन्हा पुन्हा संधी देण्यात आली आहे
यात जाणीवपूर्वक मराठा समाजाला डावलण्याचा प्रकार समोर येत आहे. मराठा समाजाच्या ताकदवर कार्यकर्त्यांना कायम पक्षात दुय्यम भूमिकेत वागवले जात आहे तसेच एका विशिष्ट समाजाला कायम झुकतं माप दिलं गेलंय. पक्षाने विचार करायला हवा की जर मराठा समाजाचा पक्षात उद्रेक झाला तर पुढील येणाऱ्या विधानसभा निवडणुकीला याची मोठी किंमत मोजावी लागेल याची पक्षाने गंभीर दखल घ्यावी”, असे सागरे यांनी म्हंटले आहे.
” या जाहीर केलेल्या राज्यपाल नियुक्त आमदारांची नियुक्ती निर्णयाचा जाहीर निषेध करतो व माझा कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा मी पक्षाच्या प्रमुखांकडे सोपवणार आहे”, अशी भूमिका दत्ता सागरे यांनी घेतली आहे.