Sharad Pawar NCP | शरद पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षांतर्गत निष्ठावान आणि गद्दार सामना रंगला; अजित पवारांची साथ दिलेल्या आमदाराच्या घरवापसीवरून पक्षात खदखद

पुणे : Sharad Pawar NCP | आगामी विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Assembly Election 2024) सर्वच पक्ष जोरदार तयारी करीत आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटात इन्कमिंग वाढताना दिसत आहे. भोसरी, हडपसर या विधानसभा मतदारसंघांतील (Hadapsar Assembly Constituency) उमेदवारांवरून पक्षात खदखद असतानाच आता जुन्नर विधानसभा मतदारसंघातही (Junnar Assembly Constituency) वादंग निर्माण झाला आहे. जुन्नरचे आमदार अतुल बेनके (Atul Benke MLA) यांना शरद पवार गटात प्रवेश द्यायचा की नाही यावरून राष्ट्रवादीत दोन गट तयार झाले आहेत.

बेनके यांना पक्षात प्रवेश द्यावा असे काही नेत्यांचा आग्रह आहे तर बेनके यांना प्रवेश न देता तेथील काँग्रेसचे नेते सत्यशील शेरकर (Satyashil Sherkar) यांना ‘राष्ट्रवादी’त घेऊन उमेदवारी द्यावी, यासाठी स्थानिक नेते आग्रही आहेत. बेनके यांचा प्रवेश घ्यायचा असेल, तर शेजारील आंबेगाव (Ambegaon Assembly Constituency) मतदारसंघातील दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil), हडपसरचे (Hadapsar Assembly Constituency) आमदार चेतन तुपे (Chetan Tupe MLA) यांनाही ‘राष्ट्रवादी’त घेण्यास काय अडचण आहे, अशी कुजबुजही स्थानिक नागरिकांमध्ये सुरु आहे.

महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) एकीकडे गद्दारांचा पंचनामा करण्यात येत असताना ‘राष्ट्रवादी’ मध्ये गद्दारांना स्थान का देण्यात येत आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शेरकर यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेऊन ‘राष्ट्रवादी’ च्या तुतारी (Tutari) चिन्हावर निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तर, आमदार अतुल बेनके यांनीही पवार यांच्या दोन्ही जुन्नर दौऱ्यात त्यांची भेट घेतली होती. या पार्श्वभूमीवर जुन्नरमध्येही निष्ठावान आणि गद्दार असा सामना पक्षातर्गत रंगला आहे.