Sahil Shilwant Nandedkar Suicide | मी जीवन एन्जॉय केले म्हणत पोलिस उपायुक्तांच्या एकुलत्या एक मुलाची गळफास घेत आत्महत्या

छ. संभाजीनगर : Sahil Shilwant Nandedkar Suicide | छत्रपती संभाजीनगर मधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. मी जीवन एन्जॉय केले म्हणत पोलिस उपायुक्तांच्या एकुलत्या एक मुलाने आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे. साहिल शिलवंत नांदेडकर (वय-१७) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. साहिल हा बारावीमध्ये शिकत होता. (DCP Shilwant Nandedkar)
मी जीवनाचा आनंद घेतला आहे, मी माघार घेत नसून मला नवी सुरुवात करायची आहे, लव्ह यू बोथ असे खोलीतील आरशावर लिहून ठेवत पोलिस उपायुक्त शीलवंत नांदेडकर यांच्या एकुलत्या एका मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्याने एवढे टोकाचे पाऊल का उचलले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, ” (दि.१२) कुटुंबाने साजरा केलेल्या दसऱ्याच्या सणात त्याने उत्साहाने सहभाग घेतला होता. रात्री उशिरापर्यंत त्याने आई-वडिलांशी गप्पा मारल्या. नेहमीप्रमाणे उपायुक्त नांदेडकर हे सकाळी सहा वाजता वॉकिंगला जाण्यासाठी उठले. तेव्हा मुलगा साहिल झोपेतून उठला नसल्याचे त्यांनी पाहिले.
त्यामुळे नांदेडकर यांनी त्याच्या खोलीचा दरवाजा वाजवून आवाज दिला. मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यांनी चार-पाच वेळा आवाज दिल्यावरही प्रतिसाद न मिळाल्यामुळे जोरात दरवाजा वाजवला. शेवटी त्यांनी बाजूला जाऊन खिडकीतून डोकावून पाहिल्यावर साहिल गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.
साहिलने नेमकी कोणत्या कारणातून आत्महत्या केली हे समजू शकलेले नाही. पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.