Raj Thackeray On Mahayuti Govt | महायुती सरकारच्या टोलमाफीच्या निर्णयावर राज ठाकरेंचे भाष्य; म्हणाले – ‘हा निवडणुकीपुरता घेतलेला निर्णय नाही याची खात्री…’

MNS-Chief-Raj-Thackeray-_-CM-Eknath-Shinde

मुंबई : Raj Thackeray On Mahayuti Govt | विधानसभा निवडणुकीला (Maharashtra Assembly Election 2024) अवघे काही तास उरलेले असताना महायुती सरकारने सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही टोलनाक्यांवर आज मध्यरात्रीपासून हलक्या वाहनांना टोलमुक्ती मिळणार आहे. (Toll Waiver Descion)

राज्य सरकारच्या या निर्णयाचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वागत केले आहे. तसेच हा निवडणुकीपुरता घेतलेला निर्णय नाही याची खात्री सरकारने जनतेला द्यायला हवी, असेही त्यांनी म्हंटले आहे. याबाबत राज ठाकरे यांनी समाजमाध्यमांवर पोस्ट करत या निर्णयावर भाष्य केले आहे. पोस्टमध्ये राज ठाकरे म्हणाले की, ” मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर आज मध्यरात्रीपासून हलक्या वाहनांना टोलमुक्ती मिळणार आहे. याबद्दल एमएमआर परिसरात राहणाऱ्या सर्व नागरिकांचे अभिनंदन आणि माझ्या महाराष्ट्र सैनिकांचा खूप खूप अभिनंदन. टोलच्या व्यवहारात पारदर्शकता हवी आणि जिथे रस्त्याच्या कामांचे पैसे वसूल झालेत, तिथले रस्ते टोलमुक्त झाले पाहिजेत या मागणीसाठी माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी प्रचंड संघर्ष केला.”

“आम्ही टोलनाक्यांची तोडफोड केली यावरून आमच्यावर टीका झाली, पण सरकार नावाची यंत्रणा कुठलीही असो, त्यांना टोकाचं पाऊल उचलल्याशिवाय गांभीर्य कळत नाही. पण असो… किमान मुंबईकर टोलमुक्त झाला आणि आमच्या आंदोलनाला बऱ्यापैकी यश आलं ही आनंदाची बाब. यासाठी राज्य सरकारचं मी अभिनंदन करेन, पण फक्त हा निवडणुकीपुरता घेतलेला निर्णय नाही, याची खात्री सरकारने जनतेला द्यायला हवी’, असे राज ठाकरे यांनी म्हंटले आहे.

ते पुढे म्हणाले, “आज मुंबई टोलमुक्त झाली पण त्या आधी किती लोकांनी टोलच्या या खेळात, संपत्तीच्या राशी उभ्या केल्या याचा हिशोबच नाही. खरंतर याची निष्पक्ष चौकशी व्हायला हवी. पण ती होईल याची फारशी खात्री नाही, कारण कोणी कोणाला पकडायचं हा प्रश्न आहे. पण ठीक आहे, मुंबईकर टोलच्या ओझ्यातून मुक्त झाले हे बरे झाले.

महाराष्ट्र सैनिकांनो, यापुढे ‘टोलच्या आंदोलनाचं काय झालं?’ असं कोणी विचारलं तर त्यांना मुंबई टोलमुक्तीचं उदाहरण अभिमानाने सांगा आणि तुम्ही एकदा ठरवलंत की गोष्ट तडीस नेता हे पुन्हा एकदा दिसलं हे विसरू नका. पुन्हा एकदा सर्वांचं अभिनंदन”, असे राज ठाकरे यांनी आपल्या पोस्ट मध्ये म्हंटले आहे.