Pune Politics News | पुण्यातील ८ विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे इच्छुक वाढले; शरद पवारांसह काँग्रेससमोर मोठे आव्हान

पुणे : Pune Politics News | मागील दहा वर्षाच्या तुलनेत यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मोठे यश मिळाल्यानंतर आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडून लढण्यास इच्छुकांची मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे.
दरम्यान पुण्यातील काँग्रेस भवनात (Congress Bhavan Pune) इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यामध्ये पुण्यातील ८ विधानसभा मतदारसंघासाठी ४४ इच्छुकांनी मुलाखती दिल्याची माहिती समोर आली आहे. तर राष्ट्रवादीकडून तुतारी या चिन्हावर निवडणूक लढण्यासाठी शरद पवार यांच्याकडे राज्यभरातून जवळपास १७०० जणांनी अर्ज पाठवून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. (Sharad Pawar NCP)
यात एकट्या पुणे शहरातील ८ विधानसभा मतदारसंघातून ४२ जणांनी निवडणूक लढवण्यासाठी अर्ज पाठवले आहेत. दरम्यान, शरद पवार यांनी नुकतेच पुण्यातील इच्छुकांच्या मुलाखतीही घेतल्या होत्या.
तुतारी चिन्हावर (Tutari) निवडणूक लढण्यास इच्छुक असणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असतानाच काँग्रेसच्या इच्छुकांच्या संख्येतही वाढ होऊ लागली आहे. मात्र इच्छुकांची वाढती संख्या शरद पवार आणि काँग्रेससाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.
पक्षाकडे अर्ज करूनही ज्यांना उमेदवारी मिळाली नाही त्या नाराज नेत्यांना विधानसभेला सामोरे जाताना पक्षात सामावून घेणे काँग्रेस आणि राष्ट्रवादीसाठी आव्हान असणार आहे.