Maval Assembly Constituency | ‘आता कसं, जनता म्हणेल तसं’, सुनील शेळकेंना चितपट करण्यासाठी वस्तादांनी पैलवान हेरला; मावळात 2019 च्या पुनरावृत्तीची चर्चा

Sharad Pawar - Sunil Shelke

मावळ : Maval Assembly Constituency | शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षात झालेले बंड राजकीय समीकरणे बदलणारे ठरत आहेत. राष्ट्रवादीत बंड झाल्यानंतर अजित पवार (Ajit Pawar NCP) काही नेत्यांना घेऊन महायुती सरकारमध्ये (Mahayuti Govt) सहभागी झाले. दरम्यान मावळचे आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांनीही अजित पवारांना पाठिंबा दिला.

आता जागावाटपात महायुतीच्या फॉर्म्युल्यानुसार (Mahayuti Seat Sharing Formula) ज्याचा विद्यमान आमदार त्या पक्षाला ती जागा याप्रमाणे मावळची जागा अजित पवार गटाला जाणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे. त्यामुळे महायुतीतील नाराज नेते पर्यायी पक्षाच्या भूमिकेत आहेत. दरम्यान सुनील शेळकेंचा करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी शरद पवारांकडून (Sharad Pawar) रणनीती आखली जात आहे.

मावळ विधानसभा मतदारसंघात महायुतीत अंतर्गत संघर्ष असल्याचे आता लपून नाही. यामध्ये सुनील शेळके यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेचेच बापू भेगडे (Bapu Bhegde) आणि भाजपचे रवी भेगडे (Ravi Bhegde) यांनी शड्डू ठोकला आहे. यात बापू भेगडे यांची निवडणूक लढवण्याची इच्छा आणि सुनील शेळके यांच्यावर असलेली नाराजी आता लपून राहिलेली नाही. मात्र बापू भेगडेंची नाराजी अजित पवार दूर करतील अशी चर्चा आहे.

मावळ विधानसभा मतदारसंघातील एकंदरित राजकारण पाहता शरद पवार यांनी आता भाजपच्याच मोहऱ्याला गळाला लावण्याची रणनीती आखली आहे. हा मोहरा म्हणजे रवी भेगडे ‘आता कसं, जनता म्हणेल तसं’ असे बॅनर लावत मावळ मध्ये जोरदार तयारी करत असलेले रवी भेगडे यांच्या संपर्कात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बडे नेते आहेत. ‘मिस्टर क्लीन’ इमेज असणाऱ्या रवी भेगडे यांना सुनील शेळके यांच्या विरोधात मैदानात उतरवण्याच्या तयारीत शरद पवारांची राष्ट्रवादी आहे.

रवी भेगडे यांच्यावर झालेल्या अन्यायामुळे रवी भेगडे यांना मावळ भाजप मधील युवक कार्यकर्ते, महिला आघाडी आणि मावळच्या जनतेचा मोठा पाठिंबा मिळत असल्याच चित्र पाहायला आहे. त्यामुळे रवी भेगडे जो निर्णय घेतील आपण त्यासोबतचं आहोत असे म्हणणारा भाजपचा एक मोठा गट तयार झाला आहे.

इतकंच नाही तर रवी भेगडे यांनी तुतारी हातात घेतली किंवा महाविकास आघाडी पुरस्कृत झाले तरी देखील आपण त्यांचीच साथ देणारं असं देखील हे लोक म्हणत आहेत. रवी भेगडे यांचे लागलेले बॅनर, त्यांच्या कार्यक्रमांना होणारी गर्दी पाहता रवी भेगडे यांना मावळ विधानसभा मतदारसंघातून मोठा पाठिंबा मिळत असल्याचे चित्र आहे. एकंदरीत रवी भेगडे शरद पवारांच्या गळाला लागतील आणि २०२९ ची मावळात पुनरावृत्ती घडेल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.