Chhagan Bhujbal News | विधानसभेच्या तोंडावर छगन भुजबळांच्या अडचणीत वाढ; नेमकं प्रकरण काय जाणून घ्या

मुंबई : Chhagan Bhujbal News | आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीत (Mahayuti Vs Mahavikas Aghadi) जागा वाटपावर चर्चा सुरु आहेत. पुढील काही दिवसातच उमेदवारांच्या याद्या घोषित होतील. अशातच आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते (Ajit Pawar NCP), मंत्री छगन भुजबळ यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी (Maharashtra Sadan Scam) सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांच्यासह आणखी दोन जणांनी याबाबत एक याचिका दाखल केली आहे.

या घोटाळ्यात भुजबळ कुटुंबियांना मिळालेल्या दोषमुक्तीविरोधात दाखल आव्हान याचिकांवर तातडीने सुनावणी घेण्याची याचिकाकर्त्यांची मागणी आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकींच्या तोंडावर मंत्री छगन भुजबळांच्या अडचणीत येत्या काळात वाढ होण्याची शक्यता आहे.

एसीबीच्या विशेष न्यायालयाने छगन भुजबळ व त्यांच्या कुटुंबीयांना ९ सप्टेंबर २०२१ रोजी दोषमुक्त केले होते. मात्र, त्या निर्णयाला सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया, दीपक देशपांडे यांच्यासह आमदार सुहास कांदे यांच्यातर्फे तीन स्वतंत्र याचिका दाखल करत आव्हान देण्यात आले होते. त्यामुळे या याचिकांवर एप्रिलमध्ये न्यायालयाने भुजबळ कुटुंबियांना नोटीसा बजावल्या होत्या.

त्यानंतर या प्रकरणाची सुनावणी थंडावली होती. याच आव्हान याचिकांवर तातडीने सुनावणी घेण्यासाठी याचिकाकर्ते आग्रही आहेत. त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकांमध्ये भुजबळांच्या मागे या प्रकरणी सुनावणी घेण्यात येणार असल्याने अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.