Maharashtra Assembly Election 2024 | दसऱ्याच्या मुहुर्तावर जागावाटप जाहीर करण्याचा मविआचा निर्णय बदलला; ‘हे’ कारण आले समोर

मुंबई : Maharashtra Assembly Election 2024 | आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीने (Mahayuti Vs Mahavikas Aghadi) कंबर कसली आहे. मागील एक महिन्यापासून महाविकास आघाडीत जागावाटपाची (MVA Seat Sharing Formula) चर्चा सुरु आहे. शनिवारी दसऱ्याच्या मुहूर्तावर जागावाटप जाहीर करण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न होता.
त्यादृष्टीने सोमवार ते बुधवार अशा सलग तीन दिवस झालेल्या बैठकांमध्ये जागा वाटप पूर्ण करायचे ठरले होते. १५-२० जागांचा तिढा राहिला तर पक्षश्रेष्ठींकडे विषय पाठवून उर्वरित जागा वाटप जाहीर करायचे असे मविआ नेत्यांनी ठरविले होते. हरियाणात काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतल्याने जागा वाटप रखडल्याचे सांगितले जात आहे.
ठाणे, पालघर जिल्ह्यातील जागा वाटपात कोणताही तिढा नाही. मात्र उर्वरित महाराष्ट्रात, त्यातही विदर्भ आणि मुंबईतील अनेक जागांवर निर्णय व्हायचा आहे. मुंबईतील ३६ पैकी अजून ८ जागांचा तिढा कायम असल्याचे मविआतील एका नेत्याने सांगितले.
विदर्भात काँग्रेसला सर्वाधिक जागा हव्या आहेत. अहेरी मतदारसंघातील अजित पवार गटाचे मंत्री धर्मराव आत्राम यांची कन्या भाग्यश्री यांनी शरद पवार गटात प्रवेश केल्याने त्यांना उमेदवारी मिळेल अशी चर्चा असताना काँग्रेसने या मतदारसंघावर दावा केल्याचे समजते.
दरम्यान महाविकास आघाडीच्या नेत्याने माध्यमांशी बोलताना सांगितले, ” २२० जागांची आमची चर्चा पूर्ण झाली आहे. उरलेल्या जागांपैकी काही जागांवर काँग्रेस-उद्धवसेना, काँग्रेस – शरद पवार गट, शरद पवार गट -उद्धव सेना अशा दोन – दोन पक्षांनी दावा सांगितल्याने त्याची चर्चा पूर्ण होऊ शकली नाही. सोमवारी आमची चर्चा पुन्हा सुरू होणार आहे.”